निफ्टीही वधारत बंद : इन्फोसिस, एचडीएफसी लि. मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजार उच्चांकी झेप घेत बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स तब्बल 740.34 अंकांनी वधारत बंद झाला आहे. प्रामुख्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता बैठक यशस्वी होण्याचे संकेत निर्माण होत आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून बुधवारचे शेअर बाजाराचे सत्र मजबुत कामगिरीसह बंद झाले आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी इन्फोसिस, एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात लिलावाची स्थिती राहिल्याचे दिसून आले. यामुळे सेन्सेक्सचा निर्देशांक भक्कम स्थितीत राहिला होता.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 740.34 अंकांनी वधारुन 58,683.99 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 172.95 ने वधारुन 17,498.25 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग प्रामुख्याने मजबूत स्थितीत राहिले. दुसऱया बाजूला आयटीसी, टाटा स्टील, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि टायटन यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
तज्ञांच्या नजरेतून
जागतिक बाजारांत चढ-उतारामधील वातावरण राहिले होते, मात्र रशिया आणि युक्रेन यांच्यात शांततेसाठी चर्चा करण्यात येऊन यातून युद्ध समाप्ती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. याच घडामोडींचा सकारात्मक प्रभाव म्हणून भारतीय बाजारातील निर्देशांकाने उसळी घेतली असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. यासोबच कच्चे तेलाचे भाव नरमाईत राहिल्याचा फायदाही बाजाराला झाला आहे.
जागतिक बाजारांतील वातावरण
आशियातील बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट लाभात तर जपानचा निक्की नुकसानीत राहिला आहे.