सेन्सेक्स 54,000 च्या वर – निफ्टी 128 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे आर्थिक समभागांची घोडदौड मजबूत स्थितीत राहिल्याने सलग तिसऱया सत्रात बुधवारी बाजाराने तेजी कायम राखली. बीएसई सेन्सेक्स बुधवारी दिवसअखेर 546 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे. यासह निर्देशांकाने विक्रमी 54,000चा टप्पा पार केला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई 546.41 अंकांनी वधारुन निर्देशांक 54,369.77 वर स्थिरावला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 128.5 अंकांनी वधारुन निर्देशांक 16,258.80 चा नवा टप्पा पार करत बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये एचडीएफसीचे समभाग सर्वाधिक म्हणजे पाच टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासोबतच कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग वाढीसह बंद झाले आहेत. याच्या विरुद्ध बाजूला मात्र टायटन, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि सन फार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी आर्थिक क्षेत्रातील समभागांनी मजबूत कामगिरी केल्याने देशातील बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. याच्यासह भारतीय स्टेट बँकेचा तिमाही अहवाल सादर करण्यात आल्यामुळे त्याचा फायदा भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांना झाल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे.
जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणासोबत देशातील विविध कंपन्या आपल्या तिमाहीचे अहवाल सादर करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. अन्य घडामोडींमध्ये लॉकडाऊनमधील शिथिलता व कोरोना संसर्गाची घटती संख्या याचाही सकारात्मक प्रभाव बाजारावर झाल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.