क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
तिसवाडी तालुका बुद्धीबळ संघटनेची 27 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी विद्यमान अध्यक्ष महेश कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘टुगेदर फॉर चेस’ हे पॅनल निवडणूक लढवीत आहे.
संघटना स्थापन झाल्यापासून महेश कांदोळकर हे अध्यक्ष असून आता तिसऱयांदा ते अध्यक्षपदासाठी उमेदवार आहे. उपाध्यक्षपदासाठी कुमारसेन कांबळी, सचिवपदासाठी दत्ताराम पिंगे, खजिनदार पदासाठी अरविंद म्हामल, संयुक्त सचिव पदासाठी ज्ञानेश्वर नाईक व कार्यकारी समिती सदस्यांसाठी प्रकाश सावंत, शिवा (आतिश) आंगले, नरेश पेडणेकर व रत्नाकार फातर्पेकर हे उमेदवार आहेत.
गेली आठ वर्षे महेश कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेने भरीव योगदान दिले आहे. विविध स्तरावर 64 स्पर्धेचे आयोजन केले आहे. विविध उपक्रम राबवून या खेळाचा प्रसार व प्रचार केला आहे. आज तिसवाडी तालुक्यात 95 फिडे मानांकित खेळाडू आहे. यात 1 ग्रॅन्डमास्टर, 2 आयएम, 2 एफएम, 1 डब्ल्यू आय एम व 4 डब्ल्यू सीएम यांचा समावेश आहे.
याशिवाय अरविंद म्हामल हे आंतरराष्ट्रीय अर्बिटर व दत्ताराम पिंगे हे फिडे आर्बिटर आहे. संघटनेने सर्वाधिक अखिल भारतीय पातळीवरील मानांकित स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मुख्यमंत्री कोविड निधीसाठी रू. 65,000 ची मदत केली आहे. सरकारच्या सहकार्याने या खेळाचा प्रसार शालेय स्तरावरून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. भविष्यात या संघटनेतर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येईल असे महेश कांदोळकर यांनी माहिती दिली आहे.