प्रतिनिधी / पणजी
राज्यात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने, या अनुषंगाने तिसवाडी तालुक्याच्या लोकांमध्ये जागृती करण्यासाठी फिरत्या वाहनातून सुरक्षेसंदर्भात आवाहन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी ताळगांव पंचायत येथून या मोहीमेची सुरुवात झाली. यावेळी ताळगांवची आमदार तथा महसूलमंत्री जेनिफर मान्सेरात, सांताक्रूझ आमदार टोनी फर्नांडिस, महापौर उदय मडकईकर, व ताळगांवचे सरपंच आग्नेल डिकुन्हा यांनी या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून मोहीमेची सुरुवात केली.
सध्या मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा प्रभाव लोकांमध्ये झालेला आहे. यादरम्यान अनेक भ्रम निर्माण झाले आहे. सदर भ्रम दूर करण्यासाठी व लोकांना सविस्तर माहीती देण्यासाठी या मोहिमेची सुरुवात केली आहे. आठवडाभर संपूर्ण तिसवाडी तालुक्यात हे वाहन फिरुन लोकांमध्ये जागृती निर्माण करणार आहे. असे महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचे रुग्ण राज्यात झपाटाने वाढत आहे. तसेच आता लोक या कोरोना विषाणूला सहजपणे घ्यायला लागले आहे. त्यामुळे लोकांना योग्य रित्या मार्गदर्शन हेतु व सरकारतर्फे तयार करण्यात आलेले नियम पाळावे या हेतूने ही मोहिम हाती घेण्यात आले आहे. असे आमदार टोनी फर्नांडिस यांनी सांगितले.
सध्या पणजीत व आजुबाजुच्या परीसरात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. लोकांनी आता काळजी घेणे आवश्यक आहे. आता गणेश चतुर्थी देखील येत असून लोकांनी आतापासूनच खरेदी सुरु करावी जेणेकरुन मोक्याच्या वेळी होणाऱया गर्दीपासून स्वतःला दूर ठेवावे. गरज असल्यास बाहेर पडाव. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन फिरावे असे आवाहन महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
तिसवाडी तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघात ही गाडी जाणार आहे. तालुक्यातील अनेक महत्वाच्या नाक्यावर ही गाडी थांबून लोकांना मार्गदर्शन करणार आहे. या जागृतीमुळे कोरोना वॉरीयर्स यांना देखील थोडीफार मदत होऊ शकते. कोरोना संदर्भात लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. असे ताळगांव पंचायतचे सरपंच आग्नेल डीकुन्हा यांनी यावेळी सांगितले.