वार्ताहर /उसगांव
उसगांव येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानतर्फे सुरु करण्यात आलेल्या घुमट आरती प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. तिस्क उसगांव येथील हॉटेल आराधनाच्या मागे अशोक नाईक यांच्या निवासस्थानी हा वर्ग सुरु करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी प्रशिक्षक प्रद्युम्न च्यारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश नाईक, पदाधिकारी यशवंत तिळवे, अशोक नाईक, प्रमोद नाईक, प्रल्हाद गावडे व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना नरेश नाईक यांनी सांगितले, आपल्या संस्कृतीचा अमोल ठेवा जपण्याचे व जतन करण्याचे कार्य प्रत्येकाकडून झाले पाहिजे. उसगावातील युवावर्गाने घुमट, समेळ व टाळ शिकून ही पारंपारिक कला जपावी. शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे ढोल-ताशा पथक आज स्पर्धेत तसेच व्यावसायिक पातळीवरही आपला दर्जा सिद्ध करू शकते. चतुर्थीनंतर भजन शिकणाऱया वर्गाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घुमट आरतीचा वर्ग चतुर्थीपर्यंत दररोज सायंकाळी सुरु राहील. उसगावातील कोणीही इच्छुक वर्गात प्रवेश मिळवू शकतात. अधिक माहितीसाठी प्रमोद नाईक 9765854977 यांच्याशी संपर्क साधावा. यशवंत तिळवे यांनी स्वागत केले तर अशोक नाईक यांनी आभार मानले.