ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली आहे. तुरुंग प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत त्याची प्रकृती स्थिर आहे.
लक्षणे दिसल्यानंतर छोटा राजन याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात छोटा राजनला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, येथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना चाचणी करून घेण्यास आणि होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. यापूर्वी बिहारचा बाहुबली आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यालाही करोनाची लागण झाली होती.
तिहार जेलचे महानिर्देशक संदीप गोयल यांनी छोटा राजन याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, या वृत्ताला दुजोरा दिला असून ते म्हणाले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच या तुरुंगातील कैद्यांना वेगळे ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.