प्रतिनिधी/ कराड
मुंबईकडून कोल्हापूर बाजूकडे निघालेल्या भरधाव ब्रिझा कारवरील चालकाचा ताबा सुटल्याची घटना मलकापूर (ता. कराड) येथे सकाळी साडेसात वाजता घडली. ताबा सुटल्याने भरधाव ब्रिझा कार महामार्गावरील दुभाजक ओलांडून विरूद्ध बाजूच्या लेनवरून जाणाऱया मिनी टेम्पो आणि टेम्पोला धडकली. या भीषण अपघातात शिल्पा मनोहर भगत (62, रा. लालबाग, मुंबई) या जागीच ठार झाल्या. तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातात कारचालक सतीश साहेबराव भोईटे (वय 45, रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव, जि. सातारा), हर्षदा मनोहर भगत (वय 40, रा. लालबाग, मुंबई), मनोहर आत्माराम भगत (रा. वऱहाड मालवण, जि. सिंधुदुर्ग), मिताली अनंत सपकाळ (32, रा. चोरांबे, ता. जावली, जि. सातारा), मिनी टेम्पो चालक महेश आनंदा गायकवाड (41, रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली) हे जखमी झाले आहेत. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तपासणीसाठी जाताना झाला अपघात
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भगत कुटुंबीय हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवण तालुक्यातील आहेत. ते मुंबईतील लालबाग येथे वास्तव्यास असतात. कराड याठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी ते त्यांच्या ब्रिझा कार (एमएच-01-सीटी-3939) मधून निघाले होते. कराडलगतच्या मलकापूरजवळ आल्यावर डी-मार्टसमोर ब्रिझा कारवरील चालकाचा ताबा सुटला. भरधाव वेगात असल्याने महामार्गावरील पुणे-कोल्हापूर लेनवरून दुभाजकला धडक देऊन ब्रिझा कार कोल्हापूर पुणे लेनवर वेगाने गेली. त्यानंतर कार कोल्हापूर पुणे लेनवरून जाणाऱया मिनी टेम्पो महिंद्रा पिकअपला जोराने धडकली. पिकअपला धडकल्यानंतर कार पुन्हा दशरथ विलास पाटील यांच्या टाटा एस. टेम्पोवर जाऊन आदळली. अचानक झालेल्या अपघातामुळे ब्रिझा कारमधील प्रवाशांनी आरडाओरडा केला. डोक्याला व तोंडावर गंभीर मार लागल्याने शिल्पा मनोहर भगत या जागीच ठार झाल्या तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले.
नागरिकांनी हलविले उपचारासाठी
महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱयांसह नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. कराड शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे कॉन्स्टेबल खलील इनामदार, हवालदार प्रशांत जाधव यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना कृष्णा रूग्णालयात हलवले. अपघातातील मयत शिल्पा भगत यांचा मृतदेह विच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.