प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील वाढे फाटा येथे तीन जण संशयित रित्या फिरताना सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी.पथकास आढळून येताच त्यांचा थरारक पाठलाग करून पकडले.त्या दोघांची चौकशी केली असता तब्बल सहा लुटमारीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून पाच दुचाकी व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.त्यांची नावे संदीप उर्फ अनिल दिलीप लवटे(वय 21, रा.मेदड, ता. माळशिरस), अभिमान अर्जुन खिलारे(वय23, रा.मोरूची), गणेश तात्या वाघमोडे(वय 26, रा.कातरखटाव )अशी आहेत.
सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक श्रीमती आंचल यांनी दुचाकी चोरीबाबत व लुटमारीबाबत गुन्हे उघड करण्याच्या सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सज्जन हंकारे यांना दिल्या.
त्यानुसार डी. बी.पथकास सूचित केले. पथक वाढे फाटा परिसरात गस्त घालत असताना तीन जण संशयित आढळून आले.त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी जाग्यावर सोडून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना शितापीने पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अधिक चौकशी केली असता गुन्हे केल्याचे उघडकीस आले. सातारा शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी, फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरवली गावच्या हद्दीत पतीपत्नीला अडवून तलवारीचा धाक दाखवून दुचाकी व सोने लुटले.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, दोन दुचाकी चोरी, वालचंदनगर पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, वारजे पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी असे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून पाच दुचाकी, दोन मोबाईल, ग्राउंडर असा सुमारे 94 हजार 590 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, हेमंत ननावरे, सागर निकम,सतीश पवार, नितीराज थोरात यांनी सहभाग घेतला होता.