स्टॉकहोम / वृत्तसंस्था
डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गुईडो इम्बेन्स या अमेरिकास्थित अर्थतज्ञांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. डेव्हिड कार्ड यांना या पारितोषिकाचा अर्धा भाग आणि इतर दोन तज्ञांना ऊर्वरित अर्धा भाग वितरीत करण्यात येणार आहे. ही घोषणा सोमवारी नोबेल निवड समितीने केली.
डेव्हिड कार्ड हे मूळचे कॅनडातील असून सध्या अमेरिकेचे निवासी आहेत. त्यांनी किमान वेतन, स्थलांतरित कामगारांचा स्थानिक कामगारांच्या वेतनावर होणारा परिणाम या विषयांवर प्रचलित समजुतींना मोडीत काढणारे मौलिक संशोधन केले आहे. किमान वेतनात वाढ झाल्यास कामगारांच्या संख्येत कपात केली जाते, ही समजूत भ्रामक असल्याचे त्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. तसेच स्थलांतरित कामगारांमुळे स्थानिक कामगारांचे वेतन कमी होत नाही, हे देखील त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यामुळे या दोन्ही मुद्दय़ांवरील प्रचलित संकल्पनांना मोठाच धक्का बसला आहे, असे समितीने स्पष्ट केले. परंपरांना छेद देणाऱया या संशोधनाला अर्धे नोबेल पारितोषिक दिले जाणार आहे.
सहाय्यभूत ठरणाऱया प्रक्रिया
अँग्रिस्ट आणि इम्बेन्स यांनी अर्थतज्ञांना साहाय्यभूत ठरेल अशा प्रक्रिया आणि पद्धती शोधून काढल्या आहेत. या पद्धतींचा उपयोग केल्यास ज्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास काटेकोर शास्त्रीय नियमांच्या आधारावर करता येत नाही, अशा व्यवहारांसंबंधीही निश्चित निष्कर्ष काढणे अर्थतज्ञांना शक्य होते. त्यांचे संशोधन अर्थतज्ञांसाठी वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन समितीने केले.