भाजपात बंडाळी : भाजपमधील मोठय़ा बंडाने पक्षश्रेष्ठी बिथरले.उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी सावित्री यांचेही बंड
प्रतिनिधी /पणजी
काल शुक्रवारी दिवसभरात तीन आमदारांनी राजीनामे दिले असून त्यात भाजपच्या दोन तर गोवा फारवर्ड पक्षाच्या एका आमदाराचा समावेश आहे. काणकोणचे आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडिस, सावर्डेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊस्कर आणि शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी हे राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर भाजपने उमेदवारी नाकारल्याने माजी पक्षाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनीही पक्षाविरुद्ध बंडाळी सुरु केली आहे.
फर्नांडिस व पावसकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेऊन भाजपलाही रामराम ठोकला आहे. शिवाय अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले आहे. पालयेकर यांना उमेदवारी देण्यास गोवा फॉरवर्ड पक्ष अपयशी ठरल्याने त्यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तथापि ते शेवटपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आता ते देखील अपक्ष लढणार, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. पालयेकर, पाऊस्कर, फर्नांडिस यांनी पर्वरी विधानसभा संकुलातील सभापती कार्यालयात जाऊन राजीनामा सादर केला.
पाऊस्कर यांनी मगो पक्षातून तर फर्नांडिस यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केले होते. त्यांनतर त्या दोघांना अनुक्रमे मंत्रिपद, उपसभापतीपद मिळाले होते. शेवटी त्यांची उमेदवारी भाजपने कापली आणि त्याचा परिणाम आता राजीनाम्यात झाला आहे.
भाजपमधील बंडाने पक्षश्रेष्ठी बिथरले
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या आजी-माजी व इच्छुक आमदारांनी राजीनाम्याचे सत्र चालवले असून बंडाचे निशाण हाती घेतले आहे. राजधानी पणजीतून उमेदवारी नाकारली म्हणून स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपचा त्याग करुन अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी देखील बंडाचा इशारा दिला असून वटवृक्ष झालेल्या भाजपला कीड लागल्याचे म्हटले आहे.
इजिदोर, दीपकनीही थोपटले दंड
इजिदोर फर्नांडिस – दीपक पाऊसकर या दोन माजी आमदारांनी देखील अपक्ष लढणार असल्याचे सांगून भाजपला आव्हान दिले आहे आणि भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते – पक्षश्रेष्ठी हे बंड स्वीकारतात की मोडून काढतात हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसाठी ही मोठी डोकदुखी ठरली असून या बंडाचा परिणाम भाजपच्या निकालावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सावित्री कवळेकर यांचेही बंड
उत्तर गोव्यात बाबूश मोन्सेरात व विश्वजित राणे यांच्या पत्नीना भाजपने उमेदवारी दिली पण दक्षिण गोव्यात कवळेकर यांच्या पत्नीवर अन्याय करत उमेदवारी दिली नाही म्हणून सावित्री कवळेकर यांनी बंड करुन भाजपचा राजीनामा दिला आहे. तसेच अपक्ष लढणार असेही बजावले आहे. एका महिलेने असे आव्हान दिल्यामुळे आता बंडखोरी थोपविण्यासाठी भाजपचे पक्षश्रेष्ठी बिथरले असून ते गोव्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
गोव्यात भाजपचे रोपटे मीच लावले : पार्सेकर
गोव्यात भाजपाचे रोपटे आपणच लावले. आज पक्षाचा वटवृक्ष झाला आहे. मात्र त्यावर बांडगुळे वाढली आहेत. झाडाला किडीनी ग्रासले आहे. एखाद्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करायची असेल तर त्या झाडावरून खाली उतरावे लागते त्याप्रमाणे आज आपण आपणच लावलेल्या आणि वटवृक्षात रुपांतर झालेल्या भाजपरुपी झाडावरून राज्याच्या हितासाठी खाली उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपच्या मूळ विचारसरणीपासून दूर जाणार नाही, असे भाजपचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, मांद्रेचे माजी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.