मुंबई / वृत्तसंस्था
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी 33 वर्षांपूर्वी क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी दिलेला भूखंड सरकारला परत केला असल्याचे म्हाडाने बुधवारी जाहीर केले. राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद आव्हाड यांनी मागील वर्षी सदर जागेवर गावसकर यांनी अकादमी सुरु केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी, गावसकर यांनी सचिन तेंडुलकरसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत अकादमी सुरु करण्याबद्दल चर्चा केली होती. पण, त्यानंतरही यात काही प्रगती होऊ शकली नाही. त्यानंतर म्हाडाने गावसकर यांना सदर भूखंड परत करण्याची विनंती केली होती.