प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्रीच्या वेळी वाढेफाटा येथील हॉटेल देहातीमधील एका खोलीत तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱया सहाजणांसह हॉटेल मालकाला ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 24 हजार 400 मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 3 रोजी वाढे फाटा येथील हॉटेल देहातीमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजय हंकारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक अमित पाटील यांच्यासह डीबीच्या कर्मचाऱयांना बरोबर घेवून हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी तिथे एका बंद खोलीत अमोल चंद्रकांत पोकळे (वय 34, रा. गुरुवार पेठ, सातारा), कपिल रामस्वरुप अग्रवाल (वय 42, रा. भोसले मळा, सातारा), राजू इकबाल शेख (वय 38, रा. कोरेगाव), विनायक भानुदास इथापे (वय 44 रा. सदरबझार, सातारा), दिलीप नामदेव इरळे (वय 50, रा. सैदापूर, ता. सातारा) व हॉटेल मालक गणपतराव विलास नलवडे (रा. वाढे) यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचनामा सुरु करण्यात आला तेव्हा या सर्वांची चांगलीच तंतरली होती.
ही कारवाई झाल्याचे कळताच एकच खळबळ उडाली होती. यात व्यापारी व राजकीय व्यक्तींचा सहभाग होता. त्यामुळे प्रचंड फोनाफोनी झाली. मात्र, सातारा तालुका पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला असून याबाबतची तक्रार पोलीस नाईक धोंडीराम हंकारे यांनी दिली आहे. या कारवाई पोलीस निरीक्षक हंकारे, उपनिरीक्षक अमित पाटील, कॉन्स्टेबल थोरात, निकम, देशमुख यांनी सहभाग घेतला होता.