धामोड / प्रतिनिधी
ज्यांच्या तीन पिढया गावची साफ-सफाई करण्यात घालविल्या अशा वंचित घटकातील ग्रा.पंचायतीचे झाडू कामगार ( स्वच्छतादूत) भिकाजी कांबळे यांच्या हस्ते धामोडमध्ये ७३ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन होणार आहे. लोकनेते आण्णासाहेब नवणे माध्यमिक विद्यालयाने त्यांना ध्वजारोहनासाठी आमंत्रित केले आहे.
जागतिक स्तरावर सार्वजनिक स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे . अशातच गावची स्वच्छता करण्यास झाडू कामगार (स्वच्छता दुत) मिळणे ग्रामपंचायतींना दुरापस्थ झाले आहे. मात्र कुरणेवाडी, लाडवाडी, जाधववाडी, नऊनंबर, तुळशी वसाहत मिळून धामोड ग्रुप ग्रा. मध्ये गेल्या तीन पिढया पासून स्वच्छता करण्याचे काम येथील भिकाजी कांबळे यांच्या कुटुंबियांनी केले आहे. ग्रा.पं.स्थापनेवेळी स्वर्गीय महादेव धोंडी कांबळे यांच्या हाती आलेला झाडू त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी स्व. तानुबाई यांच्या हाती आला. त्यांच्याही निधनानंतर त्यांचा मुलगा भिकाजी यांच्या हाती तो अविरत चालू आहे. भिकाजीला गावातील लोक आवडीने ‘ स्वच्छतादूत भिका ‘ म्हणून हाक मारतात. तुंबलेल्या गटारी स्वच्छ करणे, रस्ते, पाणवठा घाट, आठवडी बाजारातील चौक, मंदिरे आदी सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करणे भिकाचा नित्याचा क्रम. कुणीही याव, अन् भिकाला काम सांगावे आणि भिकाने ते काम विनातक्रार करावे हा भिकाबाबतचा ग्रामस्थांचा अनुभव. भिकाचे वडील स्व . महादेव कांबळे यांनी ग्रा.पं.स्थापनेपासून गावची स्वच्छता केली. त्यांच्या निधनानंतर भिकाची आई स्व .तानुबाई कांबळे यांनी तर त्यांच्या निधनानंतर सध्या भिकाजी अविरतपणे स्वच्छता करीत आहे.
अशा वंचित व दुर्लक्षित घटकातील भिकाजीच्या हस्ते ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन धामोड येथील लोकनेते आण्णासाहेब नवणे माध्यमिक विद्यालयात होणार आहे. दि. न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिपसिंह नवणे यांनी त्यांना ध्वजारोहनासाठी आमंत्रित केले आहे. नवणे यांच्या या कल्पक विचारसरणीचे परिसरातील सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे .