प्रतिनिधी /मडगाव
नगरसेवकांना दिले जाणारे मानधन मडगाव पालिकेच्या नगरसेवकांना अजूनही दिले गेले नसल्याने काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांच्याशी नाराजी व्यक्त केली आहे. मागील तीन महिन्यांचे मानधन थकीत असल्याचे नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या नजरेस आणून दिले.
26 एप्रिल रोजी नगरसेवक म्हणून निवड झाल्यापासून सदर मानधन नगरसेवकांना मिळणे क्रमप्राप्त ठरते. मात्र सदर मानधन नगरपालिका मंडळ स्थापन झाल्यापासून लागू होत असल्याचा दावा नगराध्यक्ष पेरेरा यांनी केला असता ज्ये÷ नगरसेवक राजू नाईक यांनी यास आक्षेप घेतला व नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यापासून आम्ही मानधनास पात्र ठरतो, असे नजरेस आणून दिले. यासंदर्भात मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याशी विचारणा केली असता नगरसेवक म्हणून निवड झाल्यापासून नगरसेवकांना मानधन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आवश्यक प्रक्रिया करण्याचे निर्देश : मुख्याधिकारी
जवळपास तीन महिने होत आले, तरी आधीच्या दोन महिन्यांचे मानधन नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष यांना मिळालेले नसल्याचे मुख्याधिकारी फर्नांडिस यांच्या नजरेस आणून दिले असता सदर प्रकार सोमवारी आपणास कळल्यानंतर आपण संबधित विभाग प्रमुख तसेच कॅशियरला त्वरित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नगरसेवकांना सदर मानधन देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षांना 12825 रु., तर उपनगराध्यक्ष व नगरसेवकांना 10825 रु. मानधन प्रति महिना देण्यात येते. 26 एप्रिल रोजी आम्हाला नगरसेवक म्हणून प्रमाणपत्र मिळाल्यापासून आधी मानधनास पात्र असल्याचे काही नगरसेवक दावा करत असून मुख्याधिकारी यावर सहमत आहेत. तरीही प्रशासकीय विभागाने 27 मे रोजी पालिका मंडळ स्थापन झाल्यापासून सदर मानधन देण्यासाठी प्रक्रिया केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात नगरसेवक काय प्रतिक्रिया व्यक्त करतात ते मानधन त्यांच्या हातात पडल्यानंतरच स्पष्ट होईल.