कराड पोलिसांकडून सर्व शक्यता गृहीत धरून तपास
प्रतिनिधी/ कराड
सैदापूर (ता. कराड) येथे एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपासाची सूत्रे हलवली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून चौकशीचा वेगही वाढला आहे.
सैदापूर येथील सासवे कुटुंबातील सर्वजण सोमवारी 14 डिसेंबर रोजी रात्री एकत्र जेवले. कुटुंबासमवेत एकत्रित जेवण झाल्यानंतर रात्री उशिरा त्या कुटुंबातील तीन मुली व त्यांच्या आईला उलटय़ा व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यातील तीन मुलांना जास्त त्रास झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तीन मुलींचा मृत्यू झाला. आयुषी शिवानंद सासवे (वय 3), आस्था शिवानंद सासवे (वय 9), आरुषी शिवानंद सासवे (वय 8, तिघीही रा. मिल्ट्री होस्टेलजवळ, सैदापूर, ता. कराड) या सख्ख्या बहिणींच्या मृत्यूने खळबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी गोपनीयता बाळगत वेगाने तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्वतः याप्रकरणी अनेकांकडे चौकशी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांनीही नेमकी विषबाधा झाली की अन्य काही कारण आहे, याचा शोध सुरू ठेवला आहे.
तीन मुलींचाच मृत्यू कसा ओढवला?
सासवे कुटुंब सधन असून या कुटूंबातील तीन मुलींच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्रित जेवण केले. मात्र जास्त त्रास तीन मुलींना झाला. उपचार सुरू असताना तीनही मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी चौकशीवर भर दिला असून सर्वांचे लक्ष या प्रकरणात नेमके काय झाले असेल याकडे आहे. वेगवेगळे नमुने तपासणीला पाठवले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षाही पोलिसांना आहे. तोपर्यंत पोलिसांनी नातेवाईक, शेजारील लोकांकडून माहिती मिळवणे सुरू ठेवले आहे.