नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
लोकसभेच्या तीन रिक्त जागा आणि विविध राज्यांमधील 30 विधानसभा जागा येथील पोटनिवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार या निवडणुकांसाठी येत्या 30 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे.
दादरानगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खांडवा (मध्यप्रदेश) या लोकसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय आसाममधील 5, पश्चिम बंगालमधील 4, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालय येथील प्रत्येकी 3, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान येथील प्रत्येकी 2, तर आंध्रप्रदेश हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड आणि तेलंगणा येथील प्रत्येकी 1 विधानसभेची जागा रिक्त असून तेथेही 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
संबंधित राज्यांकडून कोरोना परिस्थिती तसेच इतर संभाव्य नैसर्गिक आपत्तींची माहिती घेऊनच हा कार्यक्रम आयोजित केला गेल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर या निवडणुकांमुळे लवकरच आदर्श आचार संहिता लागू करण्यात येईल, असेही आयोगाने प्रतिपादन केले.