सहा गुह्यांची नोंद, सहा संशयितांना अटक एएनसीची बेधडक ड्रग्स विरोधी मोहीम
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) ड्रग्ज विरोधात बेधडक मोहीम राबवित आहेत. 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर या तीस दिवसांच्या कालावधीत सहा गुह्यांची नोंद केली असून तब्बल 57 लाख 60 हजार रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणी सहा संशयितांना अटक केली असून त्यात तीन नायजेरियन तर तीन भारतीय संशयितांचा समावेश आहे.
राज्यात वर्ष अखेरीस मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ांचे आयोजन होत असते. त्यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारचा ड्रग्स गोव्यात आल्याचा संशय एएनसीला असून एएनसीने बेधडक कारवाई सुरू केले आहे. कोविड 19 च्या काळात राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. नंतर त्या खुल्या करण्यात आल्या या काळात कडक तपासणी होत नव्हती. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ड्रग्स गोव्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी राज्यात ड्रग्सला कोणत्याही प्रकारे थारा देऊ नका, असा आदेश दिला होता. गुन्हा अन्वेषण विभाग तसेच इतर पोलीस विभागही ड्रग्स विरोधात छोटय़ा-मोठय़ा कारवाई करीत आहेत. ड्रग्स विरोधात कारवाई करण्यासाठी एएनसी हा खास विभाग असून एएनसी पोलिसांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. एएनसी अधीक्षक महेश गावकर उपअधीक्षक हरीष मडकईकर, निरीक्षक सुरज हळर्णकर, सीताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एएनसी विभाग काम करीत आहे.
हरमल येथे 7.60 लाखांचा ड्रग्ज जप्त
एएनसीने शुक्रवारी हरमल येथे केलेल्या कारवाईत 7 लाख 60 हजार रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त केला आहे. याप्रकरणी एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव एमेका डॅनीयल ओकोजी (41) असे आहे. संशयित गेल्या काही दिवसांपासून तो हरमल येथे भाडय़ाच्या खोलीत राहत होता. ही कारवाई 25 रोजी रात्री 7.35 ते 10.35 दरम्यान करण्यात आली आहे.
गिरकरवाडो येथे समुद्रकिनारी परिसरात संशयित फिरत होता. गस्तीवर असलेल्या एएनसी विभागाच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 31.01 ग्रॅम कोकीन, 4,444 ग्रॅम एलएसडी सापडल्याने त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. जप्त केलेल्या या ड्रग्सची किंमत बाजार भावाप्रमाणे 7 लाख 60 हजार रुपये इतकी आहे. एएनसीचे उपनिरीक्षक अरुण देसाई व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.