मंदार शेटय़ेचे शॉर्ट व्हीडिओ घालताहेत सोशल मीडियावर धुमाकूळ
आंब्रडातील फोटोग्राफरची धमाल, आजीची कमाल
टिक टॉकवर बनविले तब्बल 1242 व्हीडिओ
मालवणी भाषेतील व्हीडिओ तुफान लोकप्रिय
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
‘काय गे म्हातारे… तुझो नातू हल्ली लयच फोनवर असता…’ ‘हो… पण तुझ्या नातीक सांग, दिवसभर फोन करू नको म्हणान…’ दोन आजींमधील हे मालवणी संभाषण व्हॉटस् ऍपवर जोरात फेमस झाले. यातील एक आजी आहे, ती सिंधुदुर्गातील आंब्रडमधील. या आजीचा नातू मंदार शेटय़े याने बनविलेला हा व्हीडिओ. सिंधुदुर्गमधील फोटोग्राफर असलेल्या मंदारने टिक टॉकवर तब्बल 1242 व्हीडिओ बनविले. त्याचे जवळपास 2 लाख सबक्रायबर होते. मात्र, टिक टॉक बंद झाल्यानंतर असे अनेक मालवणी व्हीडिओ स्वत:, आजी, मित्रमंडळी यांच्या माध्यमातून मंदार छंद म्हणून तयार करीत आहे. त्याने आतापर्यंत 150 हून अधिक व्हीडिओ बनविले असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
मध्यंतरी ‘टिक टॉक’ व्हीडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यातून अनेक ‘क्रिएटर’ पुढे आले. मात्र, या टिक टॉकच्या अतिरेकानंतर त्यावर बंदी आणली गेली. तरीही टिक टॉकनंतर पर्यायी व्हॉटस् ऍप, यू-टय़ूबचा वापर करत अनेकांनी व्हीडिओ बनविण्यास सुरुवात केली. या ‘क्रिएटर’मध्ये सिंधुदुर्गमधील युवा मंडळीही कमी नाहीत. त्यांची क्रिएटिव्हिटी किती जबरदस्त आहे हे अशा व्हीडिओंच्या माध्यमातून दिसून येते.
टिक टॉकवर 1242 व्हीडिओ बनविले
याबाबत बोलताना मंदार सांगतो, आंब्रड हे आपले आजोळ, गाव शिरगाव. आई-वडील मुंबईला असतात. मुंबईत करमत नाही, गावी बरे वाटते म्हणून आजोळी राहतो. फोटोग्राफी करत असताना आपल्या अवतीभवती घडणाऱया घटनांचे, प्रसंगांचे व्हीडिओ बनविण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. त्याच कालावधीत त्याला टिक टॉकचा आधार मिळाला. टिक टॉकचा वापर करत त्याने 1242 व्हीडिओ बनविले. मात्र, टिक टॉक बंद झाल्यानंतर व्हॉटस् ऍप, इन्स्टावरतीही व्हीडिओ बनवून टाकण्यास त्याने सुरुवात केली. 30 सेकंदांपर्यंतचे हे व्हीडिओ त्याने बनविले आहेत.
17 हजारच्यावर सबस्क्रायबर
यू-टय़ूबला त्याने मंदार शेटय़ेच्या नावाने चॅनेलही सुरू केले आहेत. त्याला जवळपास 17 हजारच्यावर सबक्रायबर आहेत. मात्र, मालवणी भाषेचा अभिमान असलेल्या मंदारने आपण बनवित असलेले व्हीडिओ हे मालवणी भाषेतच व स्थानिक गोष्टींवर आधारित बनविण्याचा संकल्प केला अन् त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या मालवणी भाषेचा आपणाला अभिमान असल्याचे मंदार सांगतो. कोकणच्या बाहेर राहणारे जे आपले लोक आहेत, त्यांच्याकडून या व्हीडिओंना मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्यांच्याकडून येणाऱया कमेंटमुळे नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते, असे मंदार सांगतो.
84 वर्षीय आजीची कमाल
मंदारची आजी 84 वर्षांची आहे. मात्र, तो बनवित असलेल्या या व्हीडिओंसाठी त्याला तिचेही चांगले सहकार्य लाभत असल्याचे दिसते. प्रसंगी या टिक टॉकच्या माध्यमातूनच ओळख झालेले रत्नागिरीमधील एका क्रिकेटरशी काही व्हीडिओंची देवाणघेवाण करत ते एडिट करूनही तो व्हीडिओ तयार करतो.
दोन लाखांहून अधिकांनी व्हीडिओ पाहिले
सुरुवातीच्या कालावधीत त्याने काही शॉर्टफिल्म बनविण्याचाही प्रयत्न केलेला होता. सद्यस्थितीत या अशा व्हीडिओ बनविण्यातून आनंद मिळविणे व लोकांना आनंद देणे हा जरी उद्देश असला, तरीही त्याचा व्यावसायिकदृष्टय़ा काही लाभ होतो का? याबाबत मंदार सांगतो, या व्हीडिआंsना मिळणारा प्रतिसाद खूप काही समाधान देऊन जातो. यातून नवीन ऑर्डर, शॉर्टफिल्म, प्रमोशन, जाहिराती बनविण्यासाठीच्या ऑर्डर मिळतात. त्यातून व्यवसायासोबतच छंद जोपासत आनंद मिळतो. इन्स्टावर टाकलेल्या व्हीडिओंना दोन लाखांहून अधिकांनी पाहिलेले आहे. आपल्यासाठी हेच मोठे समाधान असल्याचे तो सांगतो.
मालवणीचा प्रसारही!
मालवणी भाषेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या बाहेर फार मोठे अप्रूप आहे. मुंबईसह इतर भागातही मालवणी भाषेबद्दल आपुलकी असल्याने मला मालवणी भाषेतूनच असे शॉर्ट व्हीडिओ करण्यासाठी अनेकजण आग्रह धरतात. ही भाषा आपली मानून सर्वजण या व्हीडिओला अधिक शेअर करतात. त्यामुळे मालवणी भाषेचा प्रसारही होत असल्याचे मंदार सांगतो.