गांधी मार्केटातील प्रकार : मडगाव पालिकेच्या बहुतेक नगरसेवकांकडून ‘सेटिंग’चा आरोप, नगराध्यक्ष – उपनगराध्यक्षांना धरले धारेवर
प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या गांधी मार्केटमधील दोन दुकानांचा लिलाव जेमतेम मासिक साडेतीन ते साडेचार हजार रुपये भाडेपट्टी ठरवून केल्याने मडगाव पालिकेच्या बहुतेक नगरसेवकांनी हे सगळे सेटिंग असल्याची टीका करत नगराध्यक्ष तसेच मार्केट समितीच्या अध्यक्षा असलेल्या उपनगराध्यक्षा दिपाळी सावळ यांना धारेवर धरले. लिलावाची प्रक्रिया योग्य प्रकारे न राबविल्याने हा लिलाव मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मडगावातील शिमगोत्सव साजरा करण्यासाठी बुधवारी मडगाव पालिकेची खास बैठक बोलविण्यात आली होती. सदर बैठक पार पडल्यानंतर नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी गांधी मार्केटमधील पालिकेच्या मालकीच्या दुकानांची लिलाव प्रक्रिया नियमांस धरून झालेली नसल्याचे सांगितले. साडेतीन ते साडेचार हजार अशी तुटपुंजी भाडेपट्टी ठरवून कोणत्या आधारे त्यांचा लिलाव करण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 15 ते 20 हजार रु. इतके भाडे गांधी मार्केटमध्ये मिळत असताना वरील तुटपुंज्या भाडय़ासाठी पालिका कशी राजी झाली, असा सवाल त्यांनी केला.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना विचारला जाब
यावेळी मार्केट समिती अध्यक्षा असलेल्या उपनगराध्यक्षा सावळ यांना जाब विचारण्यात आला असता यासंदर्भातील फाईल मार्केट समितीकडे आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतीत नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी फाईलवर सही केली असल्याने शिरोडकर तसेच मार्केट समितीचे सदस्य असलेले नगरसेवक राजू नाईक, महेश आमोणकर, जॉनी क्रास्टो व सगुण नाईक यांनी नगराध्यक्षांना फैलावर घेतले. नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षा आपल्याकडे फाईल घेऊन आल्याचे सांगितले. त्यावर आपण फाईल घेऊन नगराध्यक्षांकडे गेले नव्हते, तर लेखा व कर अधिकारी अभय राणे फाईल घेऊन आले असता आपण तेथे होते, असा दावा सावळ यांनी केला.
मार्केट समितीकडे फाईल न आल्याने आवाज उठविला : आमोणकर
मार्केट समितीचे सदस्य असलेले नगरसेवक आमोणकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मंगळवारी आम्हाला या घोळाबाबत कळून चुकले होते व आपण, राजू व सगुण यांनी अन्य दोन सदस्यांसह आवाज उठविला होता. मार्केट समितीकडे फाईल न आल्याने आम्हाला अधिकार नसल्यास आम्ही समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊ असा इशारा मंगळवारी दिला होता, असे त्यांनी सांगितले. आपण मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्याकडे मार्केट समितीकडे फाईल का पाठवून दिली नाही, मार्केट समितीला अधिकार नाहीत काय, अशी विचारणा केली असता मार्केट समितीकडे फाईल पाठविणे आवश्यक होते हे मुख्याधिकाऱयांनी मान्य केल्याचे नगरसेवक सगुण नाईक यांनी सांगितले.
चुका झाल्यास सुधारणार : नगराध्यक्ष
नगराध्यक्ष पेरेरा यांना या एकंदर घोळाबाबत विचारले असता, आपण फाईलवर सही केली होती हे त्यांनी मान्य केले. आता या लिलावाच्या फाईलसंदर्भात राबविण्यात आलेली प्रक्रिया तसेच ठरविण्यात आलेल्या भाडेपट्टीवर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ती आपण मागवून घेऊन अभ्यास करेन आणि चुका झालेल्या असल्यास त्या सुधारण्यास सांगणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तिजोरीत खडखडाट असूनही तुटपुंजी भाडेपट्टी : लोकांकडून संताप
पालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे, कर्मचाऱयांना पगार देण्यासाठी कायम ठेवीतील पैसे मुदतपूर्व काढावे लागत आहेत. सोनसडय़ावर आग लागल्यानंतर लाखो रुपये तेथे खर्ची घालावे लागलेले आहेत. अशा वेळी पालिकेचे अधिकारी 15 ते 20 हजार रु. भाडेपट्टी मिळणे शक्मय असलेली दुकाने केवळ साडेतीन ते साडेचार हजार अशा तुटपुंज्या भाडेपट्टीवर देत असल्याने मडगाववासीय संताप व्यक्त करत आहेत.