ऑनलाईन टीम/तरुण भारत
गोवा काँग्रेसने बुधवारी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना पोरिम विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेली पाच दशके त्यांनी या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर आता त्यांचा मुलगा आणि भाजप नेते विश्वजित राणे यांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितले आहे. तुम्ही निवृत्त व्हा नाहीतर मी तुमच्या विरोधात भाजपामधून निवडणूक लढेन, असेही विश्वजित राणे यांनी म्हटले आहे. प्रतापसिंह राणे यांनी मंगळवारी जाहीरपणे आपण आगामी निवडणुका लढविणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर स्थानिक पक्षांव्यतिरिक्त आप आणि टीएमसी ने निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने रंगत वाढली आहे. आपचे अरविंद केजरीवाल आणि टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी गोव्यात येऊन मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे गोवा विधानसभेची निवडणूक तुल्यबळ होणार असून भाजपला सत्ता राखण्यासाठी आणि काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे.