ऑनलाइन टीम / सिलीगुडी :
सुधरित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी च्या मुद्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सिलीगुडी येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे अँबेसिडर असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे. त्या म्हणाल्या, तुम्ही प्रत्येक प्रकरणात पाकिस्तानचा गौरव कशाला करतात?
दरम्यान, गुरुवारी कर्नाटकमधील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन हे संसदेच्या विरोधातील आंदोलन असल्याचे त्यांनी म्हटले होते.
मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारत हा समृद्ध वारसा असणारा आणि संस्कृती जपणारा देश आहे. आमच्या देशाची तुम्ही नेहमी पाकिस्तानशी तुलना का करता? तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे अँबेसिडर?