उचगाव : तुरमुरी येथील मरगाई गल्लीतील बंद घर फोडून रोख रक्कम, सोने व चांदीच्या दागिन्यांसह चार लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी एक-दीडच्या सुमारास घडली. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, बाळू केदारी भक्तीकर हे गवंडी काम करतात. ते सकाळी घराबाहेर गेले होते. त्यांच्या पत्नीही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. घराला कुलूप लावल्याचे पाहून चोरटय़ांनी दुपारी एकच्या सुमारास घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तिजोरी फोडून 50 हजाराची रोख रक्कम, सोन्याचे तीन तोळय़ांचे आणि चांदीचे 15 तोळय़ांचे दागिने असा एकूण चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
बाळू भक्तीकर हे दुपारी जेवणासाठी घरी आल्यानंतर दरवाजा आणि तिजोरी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तुरमुरी ग्रा. पं. च्या अध्यक्षा वैशाली खांडेकर तसेच इतर सदस्यांनी घराची पाहणी केली आणि वडगाव पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. वडगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून दिवसाढवळय़ा चोरी झाल्यामुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.