उचगाव : तुरमुरी ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्ष म्हणून वैशाली रघुनाथ खांडेकर यांची तर उपाध्यक्षपदी चांगदेव मारुती बेळगावकर यांनी सहा-चारच्या मताधिक्यांनी विजय मिळविला. तुरमुरी ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रामध्ये बाची व तुरमुरी या दोन गावांचा समावेश असून एकूण 10 सदस्य संख्या आहे. यामध्ये अध्यक्षपदासाठी वैशाली रघुनाथ खांडेकर व भाग्यश्री कोरडे यांनी अर्ज भरले होते. यामध्ये भाग्यश्री कोरडे यांना 4 मते मिळाली तर वैशाली खांडेकर या 6 मते घेऊन विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठी चांगदेव बेळगावकर व चंद्रकांत जाधव यांच्यात लढत झाली. यामध्ये चांगदेव बेळगावकर विजयी झाले. यावेळी लघु पाटबंधारे खात्याचे अधिकारी बी. पी. बिरादार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सदस्य सुरेश राजूकर, महादेव गुंजीकर, शोभा सनदी, सविता देवरमनी, लक्ष्मी सुतार, मारुती खांडेकर, चंद्रकांत जाधव, भाग्यश्री कोरडे उपस्थित होते.
खांडेकर घराण्याची हॅट्ट्रिक तुरमुरी ग्रा. पं. मध्ये अध्यक्ष म्हणून यापूर्वी मारुती खांडेकर, रामा खांडेकर या बंधूंनी अध्यक्षपदे भूषविली आहेत. यावेळी त्यांच्या स्नुषा वैशाली यांनी अध्यक्षपदावर बाजी मारून हॅट्ट्रिक साधली असल्याची चर्चा गावात आहे.