इस्रायलमध्ये फिल्मी स्टाईलमध्ये जेल ब्रेक – गंभीर गुन्हे असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांचे पलायन
वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायलच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱया गिलोबा तुरुंगातून 6 कैदी फरार झाले आहेत. ही घटना सोमवारी उघडकीस आली आहे. पलायन करणारे सर्व कैदी हे पॅलेस्टिनी नागरिक होते आणि त्यांच्यावर हत्या तसेच हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे नोंद होते. इस्रायलचे पंतप्रधान नेफ्टाली बेनेट यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावून याप्रकरणी विचारविनिमय केला आहे. तसेच याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
पॅलेस्टिनी आरोपी मागील काही दिवसांपासून पलायनाचा कट आखत होते. याकरता त्यांनी वॉश बेसिनखाली भुयार खणण्यास सुरू केले होते. या जागेवरून काही अंतरावर तुरुंगाची भिंत आणि त्यानंतर एक रस्ता आहे. रस्ता ओलांडल्यावर शेतजमीन असल्याने तेथे स्थानिक शेतकऱयांच्या व्यतिरिक्त फारसे कुणी ये-जा करत नव्हते.
शेतजमिनीनंतर वेस्ट बँकेचा भाग सुरू होते आणि त्याच्या नजीक एक जेनिन नावाची एक मोठी वस्ती आहे. सर्व कैदी भुयारातून बाहेर पडले आणि रस्ता ओलांडून पसार झाल्याचे पाहिल्यावर काही शेतकऱयांनी इस्रायलच्या अधिकाऱयांना याची कल्पना दिली. त्यानंतर चौकशी सुरू होत भुयाराचा थांगपत्ता लागू शकला.
पॅलेस्टिनी कैद्यांनी पलायनासाठी वापरलेल्या मार्गाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी कुठलीच माहिती दिलेली नाही. संबंधित अधिकारी या पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
कैद्यांचा शोध घेण्यासाठी इस्रायलचे पोलीस ड्रोन आणि हेलिकॉप्टर्सची मदत घेत आहेत. लवकरच पळ काढलेल्या सर्व कैद्यांना पुन्हा अटक करू असे एका अधिकाऱयाने म्हटले आहे.
पॅलेस्टाईनमध्ये मिठाईचे वाटप
इस्रायलच्या तुरुंगातून 6 कैदी पसार झाल्याचे समजताच वेस्ट बँक आणि पॅलेस्टाईनच्या अनेक भागांमध्ये लोकांनी मिठाईचे वाटप केले आहे. वाटसरूंना रोखून त्यांना मिठाई देण्यात येत होती. तर इस्रायलच्या पोलिसांनी तपासात गुप्तचर यंत्रणांनाही सामील केले आहे.