अफगाणिस्तानातून सैनिक हटविण्याची मागणी
वृत्तसंस्था/ दोहा
तालिबान अफगाणिस्तानच्या विविध हिस्स्यांवर वेगाने कब्जा करत आहे. अमेरिकेचे सैन्य माघारी परतल्यावर अफगाणिस्तानात सैनिकांना तैनात करण्यावरून तालिबानने तुर्कस्तानला धमकाविले आहे. अफगाणिस्तानात सैन्य दल तेनात करण्याचा तुर्कस्तानचा निर्णय निंदनीय असल्याचे तालिबानने म्हटले आहे.
विदेशी सैनिकांच्या रवानगीनंतर काबूल विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी तुर्कस्तानने स्वीकारल्यावर तालिबानने ही धमकी दिली आहे. तुर्कस्तानने चुकीच्या सल्ल्यावर हा निर्णय घेतला आहे. आमचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्वाचे हे उल्लंघन असल्याचे तालिबानने म्हटले आहे.
अफगाणिस्तानातून विदेशी सैनिक परतल्यावर काबूल विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी तुर्कस्तानकडे असल्याचे तेथील अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी म्हटले आहे. तुर्कस्तानने काबूल विमानतळाला सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयाकडे अमेरिका आणि तुर्कस्तानमधील संबंध सुधारण्याचे चिन्ह म्हणून पाहिले जात आहे.
तुर्कस्तानने 2020 च्या करारानुसार स्वतःच्या सैनिकांना माघारी बोलवावे असे तालिबानने बजावले आहे. तालिबान आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या कराराच्या अंतर्गतच विदेशी सैनिक अफगाणिस्तानातून काढता पाय घेत आहेत. तर हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरक्षा पुरविण्याच्या तुर्कस्तानच्या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले आहे.
अफगाणिस्तानातील काबूल विमानतळर पाश्चिमात्य देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पाश्चिमात्य देशांचे राजनयिक आणि सहाय्यकांसाठी काबूल विमानतळ बाहेर पडण्याचा मुख्य मार्ग आहे. अमेरिकेचे सैनिक परतल्यावर विमानतळावर तालिबानचा कब्जा होऊ नये म्हणून नाटो लवकरात लवकर यासंबंधी तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे.