एर्दोगान अडचणीत : रशियाकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केल्याने कारवाई
वृत्तसंस्था/ अंकारा
इस्लामिक देशांचे नेतृत्व करू पाहणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तैयब एर्दोगान यांना अमेरिकेने अडचणीत आणले आहे. तुर्कस्तानने रशियाकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केली होती. अमेरिकेने तुर्कस्तानला हा व्यवहार न करण्याचा इशारा दिला होता. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने स्वतःचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी तुर्कस्तानवर निर्बंध लादले आहेत.
ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणाऱया जो बायडेन यांच्यासाठी नवे संकट निर्माण करू शकतो. तुर्कस्तान हा नाटोचा सदस्य देश आहे. तसेच बायडेन यांची तुर्कस्तानविषयीची भूमिका नेहमीच मवाळ राहिली आहे. परंतु निर्बंधांमुळे अमेरिका आणि तुर्कस्तानात तणाव निर्माण होणार आहे.
नाटोचा सदस्य देश
रशियाकडून एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी न करण्याचा इशारा ट्रम्प प्रशासनाने तुर्कस्तान सरकारला खूपच अगोदर दिला होता. परंतु तुर्कस्तानने स्वतःच्या संरक्षण गरजांचा दाखला देत ही यंत्रणा खरेदी केली असून आता अमेरिकेने त्याच्यावर कारवाई केली आहे. नाटोचा सदस्य असलेल्या देशावर अशाप्रकारची कारवाई होणे निश्चितच महत्त्वाची घटना आहे.
तुर्कस्तानशी वाढता तणाव
दोन प्रकरणांवरून अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्यात तणावाची स्थिती आहे. सीरियात तुर्कस्तानने रशियासोबत मिळून बंडखोरांच्या विरोधात बॉम्बवर्षाव केला आहे. तर अजरबैजान आणि आर्मेनियाच्या युद्धात तुर्कस्तानने उघडपणे अजरबैजानला मदत पुरविली होती. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने तुर्कस्तानला एफ-35 स्टील्थ लढाऊ विमाने पुरविण्यास नकार दिला होता. आखात आणि मध्य युरोपमध्ये धोका वाढविण्याच्या रशियाच्या कटात तुर्कस्तान सामील असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.
भारत मात्र अपवाद
एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा भारतही रशियाकडून खरेदी करणार आहे. अमेरिकेने याप्रकरणी प्रारंभी नाराजी व्यक्त केली असली तरीही भारताने मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा मुद्दा हाताळला आहे. परंतु तुर्कस्तानला अमेरिकेची नाराजी दूर करता आलेली नाही. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तुर्कस्तानच्या 3 सर्वात मोठय़ा कंपन्यांना फटका बसणार आहे. तुर्कस्तानला आता अमेरिकेच्या बँकांकडून कर्ज मिळू शकणार नाही. अमेरिकेने पॅट्रियॉट क्षेपणास्त्रs विकण्यास नकार दिल्याने एस-400 सुरक्षा यंत्रणा खरेदी करावी लागत असल्याचा युक्तिवाद तुर्कस्तानने केला होता. ग्रीस देखील रशियाकडून प्राप्त एस-400 यंत्रणेचा वापर करत असूनही तोही नाटोचा सदस्य
आहे.