तुर्कीचा मेटे गॅझझ हा तिरंदाजीतील पुरुष एकेरीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 22 वर्षीय गॅझझ विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असून हाच लौकिक त्याने ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठावर देखील अधोरेखित केला. युमेनोशिमा पार्क आर्चरी फिल्डवर झालेल्या अंतिम लढतीत त्याने इटलीच्या मॉरो नेस्पोलीला 6-4 अशा फरकाने मात दिली. 34 वर्षीय मॉरो नेस्पोली 2012 लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णजेता व दोनवेळचा युरो चॅम्पियन आहे. मात्र, त्याला गॅझझविरुद्ध स्वतःला सिद्ध करता आले नाही.
जपानच्या फुरुकावा ताकाहारुने या इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकले. ताकाहारु यापूर्वी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अव्वलस्थान काबीज करण्यात यशस्वी ठरला होता. येथे कांस्यपदकाच्या लढतीत त्याने चायनीज तैपेईच्या तँग चिह-चूनला 7-3 अशा फरकाने नमवले.