ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ममतांनी ट्विटमध्ये म्हटलं, मला सांगायला आनंद होत आहे की, माजी मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे असनसोल इथून आमचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार असतील. तसेच माजी मंत्री आणि गायक बाबुल सुप्रियो हे आमचे बालिगंज येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार असतील.
दरम्यान, तृणमूलने दोन्ही जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपला पक्षच जिंकेल, असा दावाही केला आहे. विशेष, म्हणजे या ठिकाणच्या निवडणुकीसाठी टीएमसीने भाजपाचे माजी नेते आणि मंत्री राहिलेले शुत्रघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी देऊन, मोठा डाव खेळला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत सपाटून मार झालेल्या भाजपला पुन्हा पोटनिवडणुकीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.