ममतांच्या विधानावरून नड्डांची टीका ः
बंगालमध्ये सोमवारी झालेल्या सातव्या टप्प्यातील मतदान तसेच आठव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार समाप्त झाल्यावर भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सोमवारी संध्याकाळी कोलकात्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित केले आहे. यावेळी नड्डा यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या विधानांवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याच्या जनतेने ममतांच्या विधानांना नाकारल्याचा दावा नड्डा यांनी केला आहे.
याचबरोबर नड्डा यांनी प्रतिकूल परिस्थितीतही काम करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. ही निवडणूक अभूतपूर्व आणि अनोखी आहे. भाजपने निवडणूक आणि प्रचारात उच्चकोटीची परिपक्वता दाख्घविली आहे. तृणमूल काँग्रेसच्या चिथावणीनंतरही भाजपने दृढतेने निवडणूक लढविली आहे. तृणमूलने निवडणूक प्रचारादरम्यान खालची पातळी गाठल्याचे उद्गार नड्डा यांनी काढले आहेत.
ममतांनी वापरलेली भाषा बंगालची भाषा आहे का? या निवडणुकीत ममतांनी पंतप्रधानांना उद्देशून वापरलेले शब्द आम्ही बोलू शकत नाही. ममतांनी केलेली विधाने बंगालच्या जनतेने नाकारली असल्याचे म्हणत नड्डा यांनी मुख्यमंत्री ममतांना लक्ष्य केले आहे.
नड्डा यांनी बंगालमध्ये 7 टप्प्यांच्या निवडणुकीत स्वतःच्या मताधिकाराचा वापर करण्यासाठी राज्यातील जनतेचे अभिनंदन पेले आहे. प्रतिकूल स्थितीत भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानत असल्याचे नड्डा म्हणाले.
बंगालच्या जनतेला मताधिकार वापरण्यासाठी धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करते. बंगालच्या जनतेने प्रतिकूल स्थितीतही मतदान केले असून भाजपला स्वतःचा आशीर्वाद दिला आहे. 2 मे रोजी मोठय़ा बहुमतासह राज्यात भाजपचा विजय होणार आहे. भाजप 200 हून अधिक जागांवर विजयी होणार असल्याचा दावा नड्डा यांनी केला आहे.