बंगालमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 4 उमेदवारांचा मृत्यू
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत उत्तर 24 परगण्यातील खरदह मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. काजल यांनी रविवारी कोलकात्यातील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर कोलकात्यातील भाजप उमेदवार आणि खासदार बाबुल सुप्रियो कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
खरदहचे आमचे उमेदवार काजल सिन्हा यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांनी स्वतःचे जीवन लोकांच्या सेवेत समर्पित केले. तृणमूलसाठी दीर्घकाळापर्यंत सेवा करणारे ते प्रतिबद्ध सदस्य होते. आम्ही त्यांचे स्मरण करू. त्यांच्या कुटुंब आणि प्रशंसकांप्रति मी संवेदना व्यक्त करते असे ममतांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
बंगाल निवडणुकीदरम्यान कोविड-19 नियमांचा फज्जा उडाला होता. राजकीय नेते लाखोंची गर्दी जमवून सभा आणि रोड शो करत होते. यादरम्यान संक्रमण मोठय़ा प्रमाणावर फैलावले आहे. याचा प्रभाव नेत्यांवरही दिसून आला आहे. निवडणुकीदरम्यान आतापर्यंत 4 उमेदवारांचा मृत्यू झाला आहे. तर 6 हून अधिक उमेदवार कोरोनाबाधित आहेत.
कोरोना संक्रमणामुळे 15 एप्रिल रोजी मुर्शिदाबाद जिल्हय़ातील काँग्रेस उमेदवार रेजाउल हक यांना जीव गमवावा लागला होता. तर 16 एप्रिल रोजी रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे मुर्शिदाबाद जिल्हय़ातील जंगीपुरा मतदारसंघातील उमेदवार प्रदीप कुमार नंदी यांचाही मृत्यू झाला आहे. त्यानंतर 17 एप्रिल रोजी वीरभूम जिल्हय़ातील मुरारई मतदारसंघातील तृणमूलचे विद्यमान आमदार अब्दुर रहमान यांनाही जीव गमवावा लागला आहे. अब्दुर रहमान यंदाही तृणमूलच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते.