ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचे आज कोरोनाच्या आजाराने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तमोनाश घोष यांना मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
तमोनाश घोष हे दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसमध्ये कार्यरत होते. ते दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फालता विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार झाले होते. त्यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
तमोनाश घोष यांना ट्विटरवरून श्रद्धांजली देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, अत्यंत अत्यंत दु:खद. तमोनाश घोष हे फालता मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. 1998 पासून ते पक्षाचे कोषाध्यक्ष राहिले होते. त्यांचा निरोप घेताना निरतिशय दु:ख होत आहे. तमोनश घोष 35 वर्षांहून अधिक काळ आमच्यासोबत होते. जनता आणि पक्षासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी सामाजिक कार्य करुन मोठे योगदान दिले, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.