काँग्रेस पक्षात संशयकल्लोळ : गोवा फॉरवर्डच्या दोन आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट : दिगंबर कामत, गिरीश चोडणकर दिल्लीस रवाना
प्रतिनिधी / पणजी
आम आदमी पक्षानंतर आता तृणमूल काँग्रेस पक्षाला देखील गोव्याच्या राजकारणात उतरायचे असून येथील राजकीय नेत्यांना आपल्या जाळय़ात ओढण्याचे प्रयत्न त्या पक्षाच्या नेत्यांनी सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने मोठय़ा प्रमाणात अफवांचे पीक निर्माण झाले असून त्यातून विरोधी पक्षांमध्ये खळबळ तर उडाली आहेच, शिवाय त्यातून संशयकल्लोळ निर्माण झाले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे नवी दिल्लीला रवाना झाले. दरम्यान गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हे गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटले.
पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने एका बाजूने मगो पक्षाने आपले तोंड बंद केले आहे तर गोवा फॉरवर्डने देखील सर्व निर्णय तात्पुरते स्थगित ठेवले आहेत. काँग्रेस पक्षात मात्र ‘संशयकल्लोळ’ निर्माण करण्यात विरोधी पक्षातील काही शक्ती यशस्वी झाल्या. ममता बॅनर्जी यांनी भाजपचा गोव्यात पराभव करण्यासाठी विडा उचलला असून गोव्यात गेल्या आठवडय़ात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पाठवून त्यांनी काँग्रेस नेते लुईझिन फालेरो यांची सदिच्छा भेट घेतली. विजय सरदेसाई यांच्या बरोबरही चर्चा केली व अन्य काही नेत्यांबरोबर चर्चा करून त्यांना अनेक आश्वासने दिली. लुईझिनना राज्यसभेवर घेण्याचेही आश्वासन दिल्याचे वृत्त पसरल्यानंतर राज्यात एकच राजकीय धुमाकूळ सुरू झाला.
चर्चेसाठी कोणकोण नेते सामिल होणार ?
गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसवर तोफ डागून पितृपक्षाचे दिवस संपुष्टात आल्यानंतर घटस्थापनादिनी मी चमत्कार दाखविणार आहे. काँग्रेसने पहातच रहावे, असे जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील काही नेते हादरले. पक्षश्रेष्ठींनी गोवा फॉरवर्डबरोबर आघाडी करायची इच्छा नाही, असे स्थानिक नेत्यांना कळविले होते. परंतु सत्तेवर येणार असाल तर सर्व विरोधकांना एकत्र आणावे लागेल ही येथील परिस्थिती दिगंबर कामत यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलेली आहे. त्यातच तृणमूल काँग्रेसने गोव्यात आपल्या दोन नेत्यांना प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी पाठविल्याने नेमके काँग्रेसचे कोणकोण नेते त्यांना सामिल होणार आहेत ? यावरून संशयाची राळ उडालेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार एका बंगाली पत्रकाराने गोव्यातील काही राजकीय नेत्यांशी मैत्री साधून तृणमूलच्या नेत्यांशी गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांबरोबर गळ घालून देण्यास मदत केली. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. यतिश नाईक व माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी लुईझिनवर काँग्रेसने अन्याय केलेला आहे. काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणात विद्रोह होऊ शकतो, असा इशाराच दिला आहे.
राष्ट्रवादीकडून सर्वेक्षण सुरू
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन व प्रसून बॅनर्जी हे गोव्यात पोहोचलेले असून ते काही नेत्यांशी इथे चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात अनेक मतदारसंघामध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई, पुणे येथील माणसे नियुक्त केली आहेत. त्यांनी सर्वेक्षण सुरू केले आहे. दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर हे नवी दिल्लीला रवाना झाले असून ते आज पक्षश्रेष्ठींशी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांशी चर्चा करतील.
मगो पक्ष सध्या शांतच…
या पार्श्वभूमीवर मगो पक्षाने केवळ शांत रहाण्याचे ठरविले आहे. पितृपक्षाचे दिवस संपल्यानंतरच पुढील राजकीय पावले उचलणार आहे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर या दोघांनीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याने त्यावरही राजकीय घमासान सुरू झाले आहे.