कोलकाता
भगवान श्रीराम यांच्या पत्नी देवी सीता यांच्यासंबंधी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याकडून अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याने राजकीय वाद उभा ठाकला आहे. भाजपने तृणमूल खासदाराच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे.
बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान दर्शविणारी चित्रफित मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होत आहे. तृणमूल खासदाराच्या या चित्रफितीमुळे राज्यातील सत्तारुढ पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. भाजप नेते संबित पात्रा, तथागत रॉय, लॉकेट चॅटर्जी यांनी तृणमूल नेत्याच्या विरोधात जोरदार टीका केली आहे.
कल्याण बॅनर्जींच्या विधानावर भाजयुमोचे सदस्य आशीष जायसवाल यांनी एफआयआर नोंदविला आहे. बॅनर्जी यांच्या विधानामुळे हिंदूंसह बंगाली समाज दुखावला गेला आहे. बॅनर्जी यांनी याप्रकरणी माफी मागावी, असे जायसवाल यांनी म्हटले आहे.