कोळसा घोटाळा प्रकरण- एक महिन्यात तिसऱयांदा चौकशीसाठी पाचारण
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमधील कोळसा तस्करीप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी अभिषेक यांना पुन्हा चौकशीसाठी उपस्थित रहावे म्हणून समन्स बजावला आहे. एक महिन्याच्या कालावधीत ईडीकडून बजावण्यात आलेला हा तिसरा समन्स आहे. 21 सप्टेंबर रोजी दिल्लीतील कार्यालयात तृणमूल खासदाराला हजर रहावे लागणार आहे.
अभिषेक यांची ईडीने सोमवारीच चौकशी केली होती. तर बुधवारी चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असता ते उपस्थित राहिले नव्हते. सोमवारी चौकशीदरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी ईडीला सहकार्य केले नव्हते असे सूत्रांकडून सांगण्यात आले. अभिषेक यांची सुमारे 8 तासांपर्यंत ईडीने कोळसा घोटाळा प्रकरणी चौकशी केली होती.
अभिषेक बॅनर्जी यांना विशेषकरून बेहिशेबी रकमेबद्दल विचारणा करण्यात आली. जी त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांशी संबंधित दोन कंपन्यांकडून प्राप्त करण्यात आली होती. अभिषेक बॅनर्जी पैशांच्या स्रोताबद्दल माहिती देऊ शकले नाहीत असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही रक्कम कोळसा तस्करीतून प्राप्त केल्याचा ईडीच्या अधिकाऱयांचा दावा आहे. तसच ईडीने अभिषेक यांना त्यांच्या बँक स्टेटमेंट्स समोर ठेवून अनेक प्रश्न विचारले आहेत.
दोन कंपन्यांविषयी तपास
लीप्स अँड बाउंड प्रायव्हेट लिमिटेड आण लीप्स अँड बाउंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस एलएलपी या दोन कंपन्यांचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबांशी संबंध आहे. कथितपणे आरोपींनी एका बांधकाम कंपनीकडून 4.37 कोटी रुपयांची सुरक्षा रक्कम प्राप्त करण्यात आली होती आणि याप्रकरणी चौकशी होत आहे. अभिषेक यांचे वडिल अमित बॅनर्जी हे लीप्स अँड बाउंड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी रुचिरा बॅनर्जी स्वतःच्या वडिलांसोबत लीप अँड बाउंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक आहेत.