वार्ताहर / कुडाळ:
तेंडोली-तांबाडगेवाडी येथील रहिवासी व डंपर व्यावसायिक महेश मधुसुदन सर्वेकर (43) यांनी आपल्या घरापासून काही अंतरावर गुरुवारी सायंकाळी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
महेश काल घरीच होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून काही अंतरावर वाघबिळ परिसरात झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत निदर्शनास आला. तेथील रस्त्याच्या बाजूलाच त्यांनी दोरीने गळफास लावून घेतला. ही घटना निदर्शनास येताच ग्रामस्थांनी पोलीस पाटील संजय नाईक यांना माहिती दिली. त्यांनी निवती पोलिसांना कल्पना देताच हवालदार राजेश कोळंबकर व नितीन शेडगे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
तेंडोली सरपंच मंगेश (भाऊ) प्रभू, विजय प्रभू, पोलीस पाटील संजय नाईक, नंदू सर्वेकर, बाबी राऊळ व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सौ. एस. पी. पंडित यांनी विच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. महेश यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ व अन्य परिवार आहे. महेश मनमिळावू व प्रासंगिक स्वभावाचे होते.