गुजरात-हैदराबाद लढतीच्या माध्यमातून लॉकी फर्ग्युसन-उमरान मलिक आमनेसामने
मुंबई / वृत्तसंस्था
यंदा सातत्याने प्रतितास 150 किमी वेगाने मारा करणारा गुजरातचा लॉकी फर्ग्युसन व भेदक यॉर्करच्या बळावर तळपायाचा वेध घेण्याची क्षमता असणारा सनरायजर्स हैदराबादचा उदयोन्मुख स्पीडस्टार उमरान मलिक आज (बुधवार दि. 27) आयपीएल साखळी सामन्यात आमनेसामने भिडतील. टेबलटॉपर्स गुजरातला हैदराबादचा संघ ताकदीनिशी सामोरे जाणे अपेक्षित आहे. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
यंदा आयपीएल पदार्पण करणाऱया गुजरातसाठी हा पहिलाच हंगाम आतापर्यंत स्वप्नवत ठरत आला असून त्यांनी 7 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले आहे. आश्चर्य म्हणजे या हंगामातील त्यांचा एकमेव पराभव हा हैदराबादविरुद्धचा आहे. साहजिकच, आजच्या परतीच्या लढतीत त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
ऑरेंज आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱया हैदराबादची जलद गोलंदाजी लाईनअप अतिशय भरभक्कम असून त्यांनी मागील लढतीत आरसीबीचा अवघ्या 68 धावांमध्ये धुव्वा उडवला, ते उदाहरण ताजे आहे. मार्को जान्सन (5 सामन्यात 6 बळी), उमरान मलिक (7 सामन्यात 10 बळी), टी. नटराजटन (7 सामन्यात 15 बळी) व भुवनेश्वर कुमार (7 सामन्यात 9 बळी) हे दिग्गज बहरात असल्याने हैदराबादला अजिबात चिंता नाही. त्या तुलनेत फिरकीकडे फारसे लक्ष देण्याची गरजही या संघाला जाणवलेली नाही. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे गैरहजर असून त्याची जागा डावखुरा फिरकीपटू जगदीश सुचितला देण्यात आली आहे.
हैदराबादने सलग 5 सामने जिंकले असून ही देखील त्यांची जमेची बाजू असणार आहे. या संघाच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजी लाईनअपला सुरुंग लावणे आणि त्यानंतर फलंदाजांनी धावांचा यशस्वी पाठलाग करणे यात बरेच सातत्य राहिले आहे.
संभाव्य संघ
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलीप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सन, जे. सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
गुजरातला पॉवर प्लेमधील फलंदाजीची चिंता
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाची गोलंदाजी हैदराबादइतकी मजबूत नसली तरी मोहम्मद शमी (7 सामन्यात 10 बळी), फर्ग्युसन (7 सामन्यात 9 बळी) यांची आक्रमकता आणि रशिद खानचा (7 सामन्यात 8 बळी) वैविध्यपूर्ण मारा कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवू शकतो. टायटन्सला पॉवर प्ले फलंदाजीची मात्र अद्याप चिंता कायम आहे.
शुभमन गिलने आतापर्यंत 7 सामन्यात 207 धावांचे योगदान दिले असून मॅथ्यू वेडऐवजी संघात आलेल्या वृद्धिमान साहाला अद्याप सूर सापडलेला नाही. साहाने निर्धाव चेंडू खेळून काढल्यामुळे संघावरील दडपणही वाढत राहिले आहे. त्यामुळे, कर्णधार पंडय़ा (6 सामन्यात 295) व डेव्हिड मिलर (7 सामन्यात 220) यांना अधिक जबाबदारी घेऊन खेळावे लागेल, हे भाग आहे.
अव्वल दर्जाचा यष्टीरक्षक-फलंदाज उपलब्ध नाही, ही देखील टायटन्सची आणखी एक कमकुवत बाजू आहे. मॅथ्यू वेडला पहिल्या 5 सामन्यात सूर सापडला नाही आणि साहा स्थिर होऊन फटकेबाजी सुरु करण्यासाठी काहीसा वेळ घेतो, ही वस्तुस्थिती आहे.
अफगाणचा रहमनुल्लाह गुरबाझचा पर्याय उपलब्ध आहे. पण, त्याला खेळवण्याचा निर्णय झाल्यास विंडीजचा पेसर अल्झारी जोसेफला वगळणे भाग असेल. केवळ 1-2 सामन्यात चमकलेल्या अभिनव मनोहर व राहुल तेवातिया यांनी फिनिशर्सची भूमिका सातत्याने बजावणे या संघाला अपेक्षित आहे.
युवा अभिषेक शर्मा (7 सामन्यात 220) व तिसऱया स्थानावरील राहुल त्रिपाठी (7 सामन्यात 212 धावा) यांनी धावांचा पाठलाग करताना अधिक फटकेबाजी केली असल्याने अन्य फलंदाजांची फारशी पारख झालेली नाही. त्याचा टायटन्सला लाभ घेता येणार का, हे या लढतीत स्पष्ट होऊ शकते. टायटन्सचे गोलंदाज सनरायजर्सच्या आघाडी फळीला सुरुंग लावू शकले तर मध्यफळीसह निकोलस पूरनची बॅट तळपणार का, हे देखील दिसून येईल.