नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे. बीएसएफचा बडतर्फ कॉन्स्टेबल तेजबहादुरने ही याचिका दाखल केली होती. तेजबहादुरने वाराणसी मतदारसंघात मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु निवडणूक आयोगाने तो फेटाळला होता.
सर्वोच्च न्यायालयाने 18 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. तत्पूर्वी तेजबहादुरने अलाहाबाद उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. तेजबहादुर वाराणसीचा मतदार नाही आणि त्याने मोदींच्या विरोधात निवडणूकही लढविलेली नसल्याने याचिका रद्द करण्यात येत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाच्या विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बीएसएफच्या बडतर्फ कॉन्स्टेबलला वाराणसीच्या निवडणूक अधिकाऱयाने प्रतिज्ञापत्रात नोकरीतून बडतर्फ होण्याची विविध कारणे नमूद केल्याने नोटीस बजावली होती. समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने आयोगाने त्याचा अर्ज रद्द केला होता. सप-बसप आघाडीने मोदींच्या विरोधात तेजबहादुरला उमेदवारी दिली होती. त्यापूर्वी त्याने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. दोन्ही वेळच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये बडतर्फीचे कारण त्याने वेगवेगळे लिहिलेले होते.