लॉकडाऊनमुळे अडकले,ठेकेदाराकडून तीन महिने वेतन नाही
चिपळूण
कोकणरेल्वे मार्गावर धावणाऱया तेजस एक्प्रेसमधील कॅटरर्समध्ये काम करणारे चौदा कामगार कोरोना लॉकडाऊनमुळे येथे अडकून पडले आहेत. ठेकेदाराकडून त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिले गेलेले नाही. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी लक्ष वेधल्यानंतर कोकण रेल्वेनेही माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची तयारी चालवली आहे.
हे कामगार चिपळूण रेल्वे स्थानकाजवळ वालोपे येथे राहतात. जानेवारी महिन्यापासून ठेकेदाराने त्यांना वेतन दिलेले नाही. उत्तरप्रदेश, बिहार येथील असलेले हे कामगार लॉकडाऊन झाल्यापासून शेजारील दुकानदारांकडून उधारीवर जेवणाचे साहित्य आणत आहेत. मालक अथवा व्यवस्थापक त्यांचा मोबाईल कॉल उचलत नाहीत. या कामगारांनी आपल्या व्यथा मुकादम यांच्यासमोर मांडल्यानंतर मुकादम यांनी रेल्वेच्या बेलापूर कार्यालयाशी संपर्क साधत लक्ष वेधले.
दरम्यान, तेजस एक्प्रेसमधील कामगार हे थेट कोकण रेल्वेचे कामगार नाहीत. ते ठेकेदाराचे कामगार आहेत. शिवाय ठेकेदारही कोकण रेल्वेचा नाही. मात्र ते कामगार कोकण रेल्वेसाठी काम करत असल्याने माणुसकीच्या भावनेतून कोकण रेल्वे त्यांच्यापर्यंत पोहचून मदतीचा हात देणार आहे. कोकण रेल्वे या राष्ट्रीय संकटाच्या काळात सर्वत्र अत्यावश्यक गोष्टींच्या वाहतुकीसाठी मेहनत घेत असल्याने रेल्वे त्यांना मदत करणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.