लॉकडाऊनच्या काळातील पडझडीचे आणि घसरणीचे मळभ सरुन शेअर बाजारात आता कोरोनावरील लसीमुळे तेजीचा हंगाम सुरु झाला आहे. याकडे दोन दृष्टींनी पहावे. बऱयाच दिवसांपासून अडकून पडलेले समभाग विकून पोर्टफोलियोत नव्या काही समभागांचा समावेश करता येईल. त्याचबरोबर चांगल्या समभागांमध्ये घसरण झालेली दिसताच त्यांची खरेदी करुन ठेवता येईल. फार्मा कंपन्या सध्या सर्वाधिक तेजीत आहेत. तसेच स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये येणाऱया काळात उसळी दिसून येणार आहे. त्यामुळे अभ्यास, घडामोडींवर लक्ष आणि अचूक वेळ साधा आणि बाजी मारा !
चालू वर्षाचा मोठा कालखंड कोरोनाच्या सावटाखाली गेल्यामुळे शेअर बाजारात पडझडीचा काळ बरेच आठवडे राहिला. लॉकडाऊनच्या काळात तर सर्वच कंपन्यांच्या समभागांत विक्रमी घसरण झाली. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हळूहळू याच समभागांचे मूल्य वाढू लागले आणि बाजारात चैतन्य परतू लागले. आता तर कोरोना विषाणूवरील लसीचे आगमन होणार असल्याच्या वार्तेने आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ताहस्तांतरणास दिलेला हिरवा कंदील यांमुळे शेअर बाजारातील आनंदाला अक्षरशः उधाण आले आहे. गेल्या चार सप्ताहांतील तेजीचा सिलसिला गतआठवडय़ातही कायम राहिला. शुक्रवारी सप्ताहाअखेरीस मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 128.60 अकांची घसरण झाली आणि 44,259.74 अंकांवर तो बंद झाला; तर निफ्टीमध्ये 18.05 अंकांची घसरण होऊन तो 12,968.95 अंकांवर बंद झाला. बीएसईमध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 174 लाख कोटींवर पोहोचले आहे. शुक्रवारी बाजारात ऊर्जाक्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत मोठी तेजी दिसून आली. महानगर गॅसचा समभाग 14 टक्क्यांनी वधारला; तर इंद्रप्रस्थ गॅस आणि अदानी गॅसचे समभाग 10-10 टक्क्यांनी तेजीत राहिले. एकूण ताळेबंद पाहिल्यास बाजारातील 1768 कंपन्यांचे समभाग वधारले; तर 1031 कंपन्यांच्या समभागात घट झाली. सद्यस्थितीत बीएसईमधील 155 कंपन्यांचे समभाग गेल्या वर्षभरातील उच्चांकी पातळीवर आहेत.
चालू आठवडय़ाचा विचार करता आज (सोमवारी) सुट्टी असल्याने शेअर बाजाराचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे या आठवडय़ात चारच सत्रे पार पडतील. मागील लेखात म्हटल्यानुसार, सध्या शेअर बाजारात तेजीचा माहोल असल्याने अनेक समभागांचे मूल्य वाढले आहे. खरे पाहता हा काळ आपल्याकडील अडकून पडलेले शेअर्स विकून पैसे मोकळे करण्यास अनुकूल आहे. पोर्टफोलियोमधील बदलासाठी याची गरज असते. तसेच उच्चांकी पातळीवर भाव असलेले समभाग खरेदी करण्यात जोखीम मोठी असते. त्यामुळे बाजारात तेजी असली तरी गुंतवणूक करताना म्हणजेच नवे समभाग खरेदी करताना सबुरीचे धोरण अवलंबलेले बरे. याचा अर्थ खरेदीच करु नये असा नाही; येणार्या काळात स्मॉल कॅप आणि मिडकॅप कंपन्यांमध्ये एफआयआयकडून मोठय़ा प्रमाणावर पैसा लावला जाण्याची शक्यता आहे. सध्या औषधनिर्मिती उद्योग अर्थात फार्मा सेक्टर सर्वांत चांगल्या स्थितीत आहे. निफ्टी फार्मा निर्देशांकाने एका वर्षांत 43 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे फायझर, कॅडिला, डॉ. रेड्डीज लॅब, अरबिंदो फार्मा, सन फार्मा यांसारख्या समभागांवर लक्ष ठेवून राहून त्यात घसरण झाल्यानंतर खरेदी करुन ठेवावी. याखेरीज इडीएलवेईस हा 70 रुपये किमतीचा समभागही फायदेशीर ठरणार आहे.
बीएसईचा समभागही येत्या काळात नव्या उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या या समभागाचे मूल्य 553.40 इतके आहे. गेल्या काही दिवसांत या समभागात जवळपास 17 रुपयांची वाढ दिसून आली आहे. मध्यमकाली उद्दिष्ट ठेवून हा समभाग थोडी जरी किंमत खाली आली तरी तातडीने खरेदी करुन ठेवता येईल. इन्फोसिसचा 1112 रुपयांचा समभागही येत्या सहा महिन्यात भरीव परतावा देऊ शकतो.
याखेरीज बँकिंग आणि रिअल इस्टेटच्या क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही दीर्घकालीन टार्गेट ठेवून खरेदी करणे हिताचे ठरणारे आहे. युटीआय एएमसी हा 547 रुपयांचा समभाग येत्या सहा महिन्यांत 600 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
चालू आठवडय़ात बर्गर किंगचा आयपीओ दाखल होत आहे. दोन डिसेंबर रोजी तो खुला होऊन 4 डिसेंबर रोजी बंद होईल. याचे प्राईस बँड व्हॅल्यू 60 रुपये इतकी आहे आणि किमान 250 समभाग खरेदीची अट आहे. त्यामुळे साधारण 15 हजार रुपये गुंतवणूक अपेक्षित धरावी. या कंपनीने 2014 मध्ये भारतात आपले पहिले रेस्टॉरंट उघडले होते. 2019 मध्ये कंपनीचा महसूल 2017 च्या 230 कोटींवरुन 633 कोटींवर पोहोचला होता. आता देशभरात कंपनी स्वतःचे स्टोअर उघडणार आहे. जोखीम पत्करुन दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या आयपीओचा विचार करता येईल. चालू आठवडय़ाच्या अखेरीस आरबीआयचे द्विमासिक धोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशीही बाजारातील घाडामोडींकडे लक्ष ठेवून राहावे. सारांशाने सांगायचे झाल्यास, बाजारातील जोखीम काहीशी कमी झालेली आहे. येणारा काळ तेजीचा असणार आहे. त्यामुळे अभ्यासांती आणि अचूक वेळ साधत योग्य समभागांची खरेदी करुन आपल्या पोर्टफोलियोला सक्षम बनवण्याची संधी आहे.
– संदीप पाटील