मदतीसाठी मातेचा पदर : जवळपास तीन लाख खर्च अपेक्षित
तेजस देसाई / दोडामार्ग:
कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला. रोजगाराची साखळी अचानक बंद झाल्याने अनेकांवर बेकारीची कुऱहाड कोसळली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडॉनमुळे कोणाला आई, वडील, मुलगा, पती यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. अशी विदारक परिस्थिती असताना तेरवण येथील पाटील कुटुंबांवर डोंगराएवढे संकट कोसळले आहे. या कुटुंबातील आठवी इयत्तेत शिकणारी मुलगी कॅन्सरदृश आजाराशी झुंज देत आहे. गोव्यात तिच्यावर उपचार सुरू असून जवळपास तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असून या कुटुंबातील मातेने मुला-मुलीच्या उपचारासाठी मदतीचा पदर समाजातील दानशूरांकडे पसरला आहे.
सोमवारी सकाळी एका गृहस्थाचा फोन आला व आपणाला भेटायचे आहे, असे सांगून ’तरुण भारत’ च्या प्रस्तुत पत्रकाराची त्यांनी भेट घेतली. तेरवण जो ग्रुप ग्रामपंचायत तेरवण-मेढे मध्ये येत असला तरी या गावात जाण्यासाठी तिलारी घाटमार्गे कोल्हापूर हद्दीतून जावे लागते. गाव सिंधुदुर्गमध्ये तर बाजारहाट शिक्षण आदींसाठी येथील ग्रामस्थांना कोल्हापूर – चंदगड याठिकाणी जावेच लागते. तेथून आलेल्या गृहस्थांचे नाव बाबुराव जानू पाटील असे आहे. त्यांनी आपल्या मुलीचा आजार व कोसळलेले संकट सांगितल्यावर सुन्न व्हायला झाले.
हसती खेळती मुलगी बेशुद्ध झाली अन…
कॅन्सरशी लढत असणाऱया मुलीचे नाव अचल पाटील (8वी) असे आहे. पाटील यांच्या कुटुंबात पाच सदस्यांपैकी अचल ही त्यांची मुलगी जवळील पार्ले येथील भाई दाजिबा देसाई विद्यालयात शिक्षण घेते. हसत-खेळत घरात व प्रशालेत वावरणारी मुलगी लॉकडाऊन पूर्वी दोन दिवस घरात अचानक बेशुद्ध झाली. तिला तातडीने साटेली-भेडशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून बांबोळी येथे हलविण्यात आले. दरम्यान, दोन दिवसात लॉकडाऊन झाले व याच दिवशी सदर मुलीस कॅन्सरसदृश गाठ असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले. शस्त्रक्रिया व केमोथेरपी उपचार सुरू झाले. सध्या बाहेरील रुग्णांसाठी महात्मा फुले योजना बंद आहे. मुलीला कॅन्सर या गोष्टी ऐकताच पाटील कुटुंब हादरले. याच दरम्यान लॉकडाऊन असल्याने कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष बाबूराव हे काम करीत असलेल्या गोव्यातील हॉटेलही बंद झाले. त्यामुळे या कुटुंबाची भीतीने पायाखालची वाळू सरकली. सुदैवाने डॉक्टर चांगले मिळाले शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता केमोथेरपी सुरू आहे. मात्र, आणखीन जवळपास तीन महिने उपचार सुरू राहणार असून खर्च हा तीन लाखाच्या आसपास जाणार आहे.
हात उसणे एक लाख घेतले
पाटील यांना आतापर्यंत जवळपास एक लाख खर्च आला. शिवाय किरकोळ खर्च वेगळा एका ट्रस्टने डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाने पंधरा हजार रुपयांची मदत मिळाली व गावातील ग्रामस्थ व नातेवाईक यांचे एक लाख रुपये कर्ज स्वरुपात हात उसने घेतले. त्यामुळे आता जवळपास दोन लाख रुपये खर्चासाठी अत्यावश्यक आहेत. सदर कुटुंब धनगर समाजाचे असून आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.
मदतीचे आवाहन
अचलच्या आईने रुग्णालयातून मदतीचा पदर पुढे केला असून त्यांना कमाईतील जमेल तेवढी मदत केल्यास हा खर्च सहज शक्य आहे. एका मुलीला जीवनदान मिळणार आहे. त्यासाठी बँक ऑफ इंडिया चंदगड, सुमित्रा बाबुराव पाटील आयएफसी कोड – बीकेआयडी00009, खाते क्रमांक 091210510011529 या क्रमांकावर मदत करावी. अधिक माहितीसाठी अचलाच्या वडिलांशी – 7588902695 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.