ऑनलाईन टीम / हैदराबाद :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नंतर आता तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षण दिसून आली. त्यांना डॉक्टरांनी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे.
दरम्यान, अलिकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. येडियुरप्पा यांना आठ महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तर मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंह, काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह अनेक जणांना कोरोनाने आपले शिकार बनवले आहे.