हायड्रोइलेक्ट्रिक ऊर्जा केंद्रामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे अनुमान
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगण येथील श्रीशैलम धरणावरील किनाऱयावर असणाऱया भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक ऊर्जा केंद्रामध्ये लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या आगीच्या दुर्घटनेमुळे प्रकल्पातील युनिट चारमध्ये स्फोटांचेही आवाज झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले.
आग लागली तेव्हा ऊर्जा केंद्रामध्ये 17 कर्मचारी उपस्थित होते. तेलंगण राज्य वीज निर्मिती महामंडळाचे कर्मचारी व अभियंते येथे काम करत होते. या दुर्घटनेनंतर 8 जणांची सुटका करण्यात आली असली तरी 9 जणांना धुराच्या कोंदट वातावरणामुळे प्राण गमवावे लागले. शुक्रवारी सकाळी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर दिवसभर अग्निशमन दलाने परिसरातील धूर व आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे दुपारनंतर आणखी सहा मृतदेह हाती लागले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घटनेचा आढावा घेत मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
आगीची दुर्घटना घडलेले ठिकाण कृष्णा नदीकाठावर असून आंध्रप्रदेश आणि तेलंगणा यांना विभाजित करते. या भूमिगत ऊर्जा केंद्रामध्ये सहा मोठे जनरेटर होते. त्यापैकी चौथ्या पॅनेलमध्ये आग लागल्याचे सांगण्यात आले. आग लागल्यानंतर काही वेळातच ती भडकल्याने ती तातडीने विझविण्याची संधी कर्मचाऱयांना मिळू शकली नाही. तसेच दुर्घटना घडलेला भाग भूमिगत असल्यामुळे आणि आग लागल्यानंतर मोठय़ा प्रमाणात धूर झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. तसेच वीजपुरवठा ठप्प झाल्यामुळेही गोंधळ निर्माण झाला होता.