मलकानगिरीत प्रचंड पाऊस : हैदराबादमध्ये तलाव ओव्हरफ्लो
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादमध्ये पुन्हा जोरदार पाऊस पडला आहे. शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रविवार सकाळपर्यंत सुरूच होता. 13 ऑक्टोबर रोजी रात्री पडलेल्या पावसाने निर्माण झालेली स्थिती शहराने पुन्हा अनुभवली आहे. अनेक भागांमधील रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. शहराच्या बालानगर भागातील तलाव ओसंडून वाहू लागल्याने परिसरातील सखल भागात पाणी भरले आहे.
मेडचल मलकजगिरीच्या सिंगापूर टाउनशिप आणि उप्पलनजीक बंडलगुडामध्ये 15 सेंटीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नामपल्ली, अबिदस, कोठी, बशीरबाग, खैरताबाद, गोशमहल आणि विजयनगर कॉलनीतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी
हैदराबाद-वारंगल, हैदराबाद-विजयवाडा हे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. चत्रिनाका भागात पुराच्या पाण्यामुळे अनेक वाहने वाहून गेली आहेत. गगनपहाड भागात एक तलाव ओसंडून वाहत असल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
5 हजार कोटींचे नुकसान
अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 50 जणांना जीव गमवाव लागला आहे. राज्य सरकारला पूर आणि पावसामुळे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.