रायपूर / वृत्तसंस्था
तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमेवर सोमवारी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईमध्ये नक्षली कमांडरसोबत त्यांच्या साथीदारांचाही पाठलाग करण्यात आला. परंतु, त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. एका नक्षली कमांडरला अटक झाली असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याकडून पोलिसांनी एक रायफल, गोळय़ा आणि इतर दारूगोळा जप्त केला आहे. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तेलंगणा पोलीस, छत्तीसगढ पोलीस आणि सीआरपीएफ यांची ही संयुक्त कारवाई होती. सकाळी 10.30 वाजता ही कारवाई सुरु झाली होती.
किस्तराम पीएस सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तेलंगणाचे कोत्तागुडमचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. त्यात घटनास्थळी सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून मोठय़ा प्रमाणात हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी शोधमोहीम आटोपल्यानंतर पोलिसांकडून लगतच्या भागांत गस्त घालण्यात येत होती.