वृत्तसंस्था /हैदराबाद
1970 आणि 80 च्या दशकातील तेलगू चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार राहिलेले शिवा रामा कृष्णा घट्टामनेनी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले आहे. तेलगू स्टार महेश बाबू यांचे ते वडिल होते. तेलगू चित्रपटसृष्टीत त्यांना सुपरस्टार कृष्णा या नावाने ओळखले जाते. सुमारे 350 चित्रपटांमध्ये अभिनय केलेले कृष्णा हे सप्टेंबर महिन्यात पत्नी इंदिरा यांच्या निधनानंतर नैराश्यग्रस्त झाले होते.
सुपरस्टार कृष्णा यांचे हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झाले आहे. श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना सोमवारी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे तेलगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कृष्णा यांनी 350 चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक असण्यासह ते राजकारणी देखील होते. 2009 मध्ये कृष्णा यांना पद्म भूषणने गौरविण्यात आले होते.