ऑइल इंडियाच्या प्रकल्पात दुर्घटना
गुवाहाटी : आसामच्या तिनसुकिया जिल्हय़ाच्या बाघजन येथील ऑइल इंडियाच्या तेलविहिरीनजीक मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन विदेशी तज्ञ जखमी झाले आहेत. या विदेशी तज्ञांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 9 जून रोजी या तेलविहिरींना आग लागली होती. ही आग विझविण्याचे काम सुरू असताना नव्याने दुर्घटना घडली आहे. तिनसुकिया जिल्हय़ाच्या बाघजनमध्ये ऑइल इंडियाच्या तेलविहिरीनजीक स्फोट झाला असून यात घटनास्थळी हजर असलेले 3 विदेशी तज्ञ जखमी झाल्याची माहिती कंपनीचे प्रवक्ते त्रिदीप हजारिका यांनी दिली आहे. स्फोटानंतर आग विझविण्याची मोहीम तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली आहे. बाघजन येथील वायूविहरींमध्ये लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नांना पूरसंकटाचा फटका बसला आहे. मुख्य विहिरीनजीक तयारीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. परंतु तेथे पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तिनसुकिया जिल्हय़ाच्या बाघजन येथील तेलविहिरीला 9 जून रोजी लागलेल्या आगीत कंपनीच्या 2 कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला होता.