चौघा जणांविरुद्ध एफआयआर : जिल्हय़ात बेकायदा स्फोटकांविरुद्ध पोलिसांची जोरदार मोहीम
प्रतिनिधी / बेळगाव
बेकायदा स्फोटकांविरुद्ध जिल्हा पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. शनिवारी सायंकाळी तेलसंग, ता. अथणी येथे मोठय़ा प्रमाणात जिलेटिनच्या कांडय़ा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक्टर व हिताची कंपनीचा एस्कॅव्हेटर जप्त केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार बी. बी. पाटील, जी. पी. राठोड, एस. बी. करोशी, एस. बी. नाईक आदींचा समावेश असलेल्या पथकाने अचानक छापा टाकून जिलेटिनच्या कांडय़ांसह वाहने जप्त केली आहेत.
शिवराम धोंडिबा लोखंडे रा. तेलसंग, इरय्या रुद्रय्या हिरेमठ रा. यक्कुंडी, ता. बबलेश्वर, बाळेश मलकाप्पा अनंतपूर रा. गोटे, ता. जमखंडी, हिताची चालक विजय लालू जाधव, रा. जालिहाळ तांडा, ता. बसवनबागेवाडी या चौघा जणांविरुद्ध ऐगळी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रत्येकी 200 कांडय़ा असलेले जिलेटिनचे तीन बॉक्स, आणखी एका ठिकाणी ठेवलेल्या 128 जिलेटिनच्या कांडय़ा, दोन ट्रक्टर, एक हिताची एस्कॅव्हेटर असे सुमारे 80 लाखाहून अधिक किमतीचे साहित्य जप्त केले आहे.