प्रतिनिधी/ बेळगाव
कुटुंब चालविण्याची जबाबदारी पुरुषाची असली तरी घरातील स्वयंपाक घराचे व्यवस्थापन मात्र महिलावर्गाकडेच असते. यामुळे दर वाढले अथवा घसरले की याची झळ प्रथम गृहिणींना बसते. कारण स्वयंपाक घराचे आर्थिक बजेट कोलमडून जाते. अर्थात तेलाच्या वाढणाऱया किमतींनी महिलावर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले असून सातत्याने सुरू असणारी तेलाच्या दरातील वाढ महागाईत भर टाकणारी ठरत आहेत. मागील दीड-दोन महिन्याच्या तुलनेत 20 रुपयांनी तेल महागले असून यामुळे फोडणी करपली आहे. भाज्यांच्या किमती कमी झाल्याने खूश असलेल्या महिलावर्गाला फोडणीच्या तेल दराची चिंता सतावत आहे.
सध्या बाजाराचा आढावा घेतला असता मागील महिनाभरापासून सातत्याने किलो 4 ते 5 रुपयांनी तेलाच्या किमती वाढत चालल्या असून यामुळे 120 रुपये किलो असणारे तेल 140 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. तेलदराने शतक पार केल्यानंतर नागरिकांना महागाईच्या भस्मासूराची कल्पना आली. मात्र तेलदर आता दीडशतक पार करत असून पुढे सातत्याने किमती वाढल्यास जगायचे कसे आणि घर खर्चाचा ताळेबंद कसा साधायचा असा प्रश्न भेडसावत आहे.
सध्या सोयाबीन तेलाचा दर 140 रु. किलो, सूर्यफूल तेल 145 ते 150 रु. किलो, शेंगतेल 150 रु. किलो, पामतेल 120 ते 125 रु. किलो अशा स्वरुपात किरकोळ दराने विक्री केली जात आहे. तेल डब्याच्या दरात देखील वाढ झाली असून सोयाबीन तेलाचा डबा 2000 रु. तर सूर्यफूल आणि शेंगतेलाचा 15 किलोचा दर 2200 रुपये झाला आहे. यामुळे सदर वाढ सर्वसामान्यांना अर्थार्जन, महागाई आणि उदरनिर्वाह यांचा ताळमेळ साधताना मोठी कसरत करावी लागत आहे.
व्यवसायाबरोबरच रोजच्या दीनचर्येलाही फटका
तेल दरवाढीचा फटका व्यवसायाबरोबरच रोजच्या दीनचर्येवरही बसला आहे. तेल वाढल्याने उत्पादित फराळांचे दर देखील वाढविण्याची वेळ आली आहे. मात्र तसे केल्यास ग्राहकांना परवडणारे नसल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. शिवाय घरात विविध पदार्थ बनविताना तसेच देवासमोर दिवा लावायचा असल्यास देखील वाढलेल्या किमतीचा विचार करावा लागत असल्याचे स्मिता आर्य यांनी सांगितले.
आवडीनिवडीच्या पदार्थांना घालावी लागतेय मुरड
कोरोनाकाळात सर्वच जण घरात असल्याने आवडीनिवडीचे पदार्थ बनविताना तेलाचा वापर वाढल्याने महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले. सध्या कोरोनाची भीती असल्याने कोणताही पदार्थ घरी बनविण्याचा अट्टाहास केला जातो. मात्र तेल महागल्याने याला मुरड घालावी लागत आहे. 100 रु. असणारे तेल दीडशेजवळ आल्याने महिन्याचा बाजार खरेदी करताना अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याचे मत अपर्णा मायाण्णाचे यांनी व्यक्त केले.
स्वयंपाक करताना तोलून-मापून तेलाचा वापर करण्याची वेळ
तेलाचे दर वाढल्याने कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे. महिन्याभरासाठी लागणारे तेल खरेदी करताना दरवेळीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय-उद्योगांवर परिणाम झाला असताना दैनंदिन खर्च भागविताना करावी लागणारी कसरत गृहिणींना अडचणीची ठरत आहे. यामुळे स्वयंपाक करताना तोलून मापून तेलाचा वापर करण्याची वेळ आली असल्याचे उज्ज्वला देसूरकर यांनी सांगितले.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड
तेल दरवाढीने फोडणी महागली आहे. 140 रु. किलो दरामुळे विविध पदार्थ बनविताना तेलाचा जपून वापर करण्याची वेळ आली आहे. गृहिणी म्हणून कुटुंबाचे आर्थिक गणित सांभळताना खर्च वाढला आहे. तेलाशिवाय पदार्थ बनणे कठीण असल्याने अशी महागाई वाढत राहिल्यास सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनणार असल्याचे मत अमृता अनगोळकर यांनी व्यक्त केले.