शाळेतील इतर विद्यार्थ्यांचीही चाचणी होणार
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्पमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ‘त्या’ दोन विद्यार्थ्यांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांचीही चाचणी केली जाणार असल्याचे शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी सांगितले. सोमवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यांच्या स्वॅब चाचणीचा अहवाल मंगळवारी सकाळी प्राप्त झाला. ते दोन्ही विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. लक्षणे तीव्र नसल्याने त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
तुर्तास पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. पण दहावीचे वर्ग सुरू आहेत. इतर वर्ग बंद असल्याने सामाजिक अंतराची समस्या सुटली आहे पण बसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. परिणामी, धोका कायम आहे. विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पाठविण्यास पालकांमध्ये निरुत्साह आहे. मात्र दहावीच्या वर्गात कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे. आणखी एक विद्यार्थिनी बाधित?
ज्या शाळेत दोन विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत त्याच शाळेजवळच्या मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी बाधित झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत दुजोरा मिळालेला नाही. बुधवारी याबाबत खुलासा केला जाण्याची शक्यता आहे.