चीनच्या वुहान आणि हुबेई प्रांतातून सुरू झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग आता 132 देशांपर्यंत पोहोचला आहे. चीननंतर इटली आणि इराणमध्ये या विषाणूने सर्वाधिक बळी घेतले आहेत. परंतु चीनला लागून असलेल्या तैवानमध्ये कोरोनाने मात्र उग्र रुप धारण केले नाही. चीनमध्ये बळी तसेच रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना तैवानमध्ये मात्र ती कमी होतेय. विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी तैवानच्या सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. शाळांमध्ये सर्वांना मास्क परिधान करण्याचे बंधन आहे.
50 रुग्ण आढळल्यावर तैवान सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. चीनला लागून असूनही तैवानने कोरोनाचा संसर्ग कसा रोखला हे जाणून घेण्यासाठी आता प्रत्येक देश उत्सुक आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर तैवानमध्ये याचा आकडा अधिक राहण्याची भीती व्यक्त झाली होती. चीनमधील रुग्णांची संख्या 80 हजार झाली असली तरीही तैवानने हा आकडा 50 वरच रोखला.
नॅशनल हेल्थ कमांडर सेंटर
तैवानने खूपच लवकर या संसर्गाचे गांभीर्य ओळखले हेते. 2003 मध्ये सार्सच्या फैलावानंतर तैवानने नॅशनल हेल्थ कमांड सेंटर स्थापन केले होते. कोरोना महामारीचे रुप धारण करणार असल्याची जाणीव होताच तैवानने युद्धपातळीवर सज्जता केली आहे.
प्रवासावर बंदी
तैवानने स्वतःच्या नागरिकांवर चीन, हाँगकाँग आणि मकाउ येथे जाण्यास बंदी घातली आहे. सरकारने सर्जिकल मास्कच्या निर्यातीवर बंदी घालत देशांतर्गत पुरवठा कायम ठेवला आहे. तैवानच्या प्रशासनाने उपलब्ध साधनसामग्रीचा अत्यंत विचारपूर्वक वापर केला आहे. नॅशनल हेल्थ इंशोरन्स, इमिग्रेशन आणि कस्टमकडून डाटा प्राप्त करत लोकांच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेत कुठल्या लोकांना संसर्ग होऊ शकतो, याचा अंदाज घेत उपाययोजना राबविल्या आहेत.
ऍपची निर्मिती
देशात प्रवेश करताच क्यूआर कोड स्कॅन करून स्वतःची लक्षणे तसेच प्रवासाची माहिती नोंदविता येणारे काही ऍप्स तैवानने निर्माण केले आहेत. ऍपमधील नोंदीनुसार संबंधितांना संदेश प्राप्त होतो. संदेशाच्या स्वरुपानुसार कस्टम अधिकारी संबंधिताला प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय घेतात.
जनतेचा कौतुकास्पद सहभाग
संसर्ग रोखण्यास सरकारसह तेथील जनतेनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशांचे जनतेने तंतोतत पालन केले आहे. आजाराची जाणीव होताच लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले आहे. सार्सवेळी उद्भवलेल्या अडचणी पाहता तैवानच्या जनतेने यंदा मात्र सामाजिक एकजुटतेचे दर्शन घडविले आहे.
बायोमेडिकलमध्ये गुंतवणूक
तैवानने बायोमेडिकल संशोधनात प्रचंड गुंतवणूक केली आहे. कोरोना विषाणूप्रकरणी तैवानला अत्यंत वेगाने चाचणी केंद्र स्थापन करण्यास यश मिळाले आहे. केवळ 20 मिनिटांत संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे नाही हे स्पष्ट करणारी उपकरणे निर्माण करण्यात आली आहेत. संसर्गाची चाचणी करणारी उपकरणे जनतेला पुरविण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे.